शिरसोली : येथील ‘जनता कोविड लसीविनाच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच त्याची दखल जिल्हा आरोग्य अधिकारी बी. टी. मुजुमदार, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय चव्हाण, म्हसावद वैद्यकीय अधिकारी नीलेश अग्रवाल यांनी घेऊन शिरसोली प्र. बो. येथे १० मे रोजी सकाळी लसीकरणास सुरुवात केली. त्यामुळे शिरसोली येथील जनतेने ‘लोकमत’चे कौतुक केले.
शिरसोली प्र बो व शिरसोली प्र नं. ही दोन स्वतंत्र गावे असून येथील वयोवृध्दाना कोविड लसीकरणासाठी तेरा कि.मी. अंतरावर जाऊन लस घ्यावी लागत होती. म्हसावद आरोग्य केंद्रात कधी गर्दी तर कधी लसीचा तुटवडा यामुळे येथील वृद्धांची फरपट होत होती. यामुळे शिरसोली येथे लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी करणारे वृत्त ‘लोकमत’ने ८ मे रोजीच्या अंकात प्रकाशित केले होते. याची दखल आरोग्य विभाग, शिरसोली प्र.बो. व प्र.नं. ग्रामपंचायतीने घेऊन शिरसोली प्र. बो. पाण्याच्या टाकी जवळील आयुष्यमान भारत या आरोग्य विभागाच्या इमारतीत १० मे रोजी सकाळी दहा वाजेपासून सभापती नंदलाल पाटील यांना पहिली लस देऊन सुरुवात केली. या वेळी सरपंच प्रदीप पाटील, सरपंच हिलाल भिल, श्रावण ताडे, विनोद भिल, अनिल पाटील, प्रवीण पाटील, पोलीस पाटील शरद पाटील, ग्रामविस्तार अधिकारी दिलीप शिरतुरे, अर्जुन पवार यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. या वेळी शंभर जणांचे शांततेत लसीकरण झाल्याचे म्हसावद विभागाचे आरोग्य अधिकारी नीलेश अग्रवाल, डॉ. तेजस्विनी देशमुख,अनिल महाजन, नीलेश चौधरी, श्रीकांत बारी यानी सांगितले.