जळगाव : शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयात तपासणीसाठी गेलेल्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या पथकाला महिला तक्रार निवारण समितीचा फलक न दिसल्याने त्यांनी तातडीने आदेशाचे पालक करा म्हणून निर्देश दिले. त्यानुसार या महाविद्यालयातील स्थापन असलेल्या समितीचा फलक तातडीने प्रदर्शनी भागात लावण्यात आल्याने तिथल्या महिला कर्मचारी व विद्यार्थिंनीना दिलासा मिळाला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक आस्थापनांसह महाविद्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले होते. तसेच समिती स्थापन केल्यावर त्याची माहिती देणारा फलक प्रदर्शनी भागात लावण्याचेही निर्देश दिले आहेत. तशातच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनीता सोनगत यांनी सर्वच आस्थापनांची तपासणी करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार संरक्षक अधिकारी भरत राणे, परिविक्षाधीन अधिकारी महेंद्र पाटील यांनी शासकीय होमिओपॅथी महाविद्यालयाला भेट दिली. या महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीचा फलक दिसून आला नाही. त्यानुसार विचारणा केल्यावर समितीची स्थापना झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र फलक लावला गेला नसल्याचे सांगण्यात आले. तेव्हा तातडीने फलक लावण्याच्या सूचना केल्यानंतर त्याची अंमलबजावणीही करण्यात आली आहे.
‘बालविवाह’ कायद्याचा फलक सक्तीचामंगल कार्यालयात व धार्मीक स्थळी मुला-मुलींचे विवाह होत असतांना मुलीचे वय १८ व मुलाचे वय २१ पूर्ण झाले असल्याची पडताळणी शालेय कागदपत्र पाहूनच करावी. शिवाय मंगल कार्यालयाच्या धार्मिकस्थळांच्या दर्शनी ‘बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम २००६’व ‘हुंडा प्रतिबंधक अधिनियम १९६१ चे माहिती फलक,मॅटेलीक बोर्ड, वॉल पेंटींग हे कायम स्वरुपी दर्शनी भागावर लावणे जिल्हाधिकारी यांच्या सुधारित आदेशानुसार बंधनकारक झाले आहे. असे घडत नसल्यास संबंधित पोलीस स्टेशन, महिला हेल्पलाईन क्रमांक १०९१ व १८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.