पारोळा : आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेतील शिक्षकास सर्जरीसाठी मदतीचा हात पुढे करुन शाळेच्या माजी विद्यार्थ्यांने स्तुत्य कार्य केले. सध्या पीएसआय असलेल्या माजी विद्यार्थ्यांने याद्दवारे माणुसकीचे दर्शन घडविले आहे.पारोळा: राजवड प्राथमिक शाळेचे शिक्षक रघुनाथ सरदार हे पाच दिवसापूर्वी लग्नकार्य आटोपुन आपल्या पत्नीसह कासोदा -पारोळा या रस्त्याने पारोळा येथे परत येतांना एका चारचाकीने मोरफळ फाटयाजवळ त्यांना धडक दिली. यामुळे हे पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात शिक्षकाच्या पाय व डोक्यास तर त्यांच्या पत्नीच्या बरगड्यांना आणि डोक्याला मार लागला. यानंतर पारोळा येथे दवाखान्यात प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले. पण या दोघांनाही जास्त त्रास व्हायला लागल्यामुळे ते तपासणीसाठी धुळे येथे गेले. तपासणी अंती शिक्षक सरदार यांच्या गुडघ्याखालील नस व हाड कापले गेल्याचे लक्षात आल्याने त्वरीत सर्जरी करुन घेण्याचा सल्ला त्यांना दिला. यासाठी सत्तर हजार रुपयापर्यंत खर्च सांगितला.सरदार हे कुटुंबात एकटेच कमाविते व जबाबदाऱ्या जास्त असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. हा आताच करावा लागणारा खर्च ऐकुन ते हवालदिल झाले व घरी परत आले व त्रास सहन करीत राहिले. ही गोष्ट शिक्षक सुनील जाधव (हिरापूर) यांना समजल्यावर त्यांनी त्यांची भेट घेवुन परिस्थिती जाणुन घेतली. त्यांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन त्यांनी शेळावे केंद्राच्या शिक्षक व्हॉटसअप ग्रुप वर केले. गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, केंद्र प्रमुख जितेंद्र पवार यांच्यासह सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु - भगिनींनी आर्थिक मदत गोळा केली.याचबरोबर पुरेशी मदत मिळवून देण्यासाठी धाबे शाळेचे राज्य आदर्श शिक्षक मनवंत साळुंखे व पारोळा तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांनी स्वत: मदत देवून आणखी प्रयत्न सुरू केले. देवगावचे सुपुत्र व मुंबई येथील ााता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस स्थानकाचे पीएसआय प्रशांत प्रभाकर पाटील यांनी त्वरीत प्रतिसाद देवुन सरदार यांचा बॅक खाते नंबर मागवून इंटरनेटच्या माध्यमातुन आपली आर्थिक मदत पाठविली.लवकरच करणार शस्त्रक्रियाप्रशांत पाटील हे देवगांवचे रहिवासी असुन गजानन हायस्कुलचे मुख्याध्यापक गणेश जाधव यांचे पुतणे आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजवड जि.प. शाळेत झाले असून २०१२ मध्ये एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होवुन त्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. ते या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन म्हणुन नियमित कार्यशाळा आयोजित करुन बक्षिस म्हणुन पुस्तके वाटतात. त्यांनी ओळख नसतांनाही आपण शिकलेल्या शाळेतीला शिक्षकांना आज गरज आहे म्हणुन आर्थिक मदत पाठवुन बाहेरून कडक खाकी वर्दीच्या आत सुध्दा पोलिसात एक संवेदनाक्षम माणूस लपलेला असतो याचे उदाहरण दिले. तसेच याच ग्रुप वरील पारोळा शहर तलाठी निशिकांत माने यांनीही सरदार यांना रोख मदत दिली आहे. रुग्ण वाहिका चालक ईश्वर ठाकुरही मदतीसाठी पुढे आले आहेत. लवकरच सरदार यांचेवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शिक्षकाच्या शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 9:01 PM