जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने, या काळात काही दिवस शहरातील बँकादेखील बंद होत्या. तसेच शहरातील बहुतांश एटीएममधील रक्कम संपल्याने एटीएम बंद होते. अशी सर्व आर्थिक आणीबाणीची परिस्थिती असताना, पोस्टाच्या पेमेंट बँकेने मात्र शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा आर्थिक आधार दिला. पोस्ट पेमेंट बँकेअंतर्गंत घरोघरी जाऊन पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी जळगाव विभागात सात कोटींचे वाटप केले.
बँकेप्रमाणे आता पोस्टातही सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार होत असल्यामुळे, नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकांमध्ये गर्दीचे प्रमाण जास्त राहत असल्यामुळे नागरिकांनी पोस्टाला प्राधान्य देऊन, पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यामातून विविध व्यवहार करत आहेत. यंदा कोरोनाच्या महामारीत तर नागरिकांना या पोस्ट पेमेंट बँकेचा चांगलाच फायदा झाला. कोरोनामुळे सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था बंद असताना, पोस्टाच्या जळगाव विभागातील ३५० पोस्टमन बांधवांनी ‘आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टीम’च्या माध्यमातून ५० हजारपेक्षा जास्त व्यवहार केले. या माध्यमातून सुमारे सात करोडपेक्षा जास्त रक्कमेचे वाटप करण्यात आले असल्याचे पोस्ट विभागातर्फे सांगण्यात आले.
सात कोटी रुपयांचे पोस्ट बँकेकडून लॉकडाऊन काळात घरपोच वाटप
५० हजार नागरिकांना घरपोच वाटप
३५० पोस्टमननी बजावली सेवा
इन्फो :
तीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी उघडले खाते :
राज्य शासनाकडून पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपसाठी पात्र अशा आठ हजार ९०० विद्यार्थ्यांची यादी जळगाव डाक विभागाला प्राप्त झालेली आहे. त्यानुसार जळगाव डाक विभागामार्फत तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचे खाते उघडण्यात आले असल्याचेही पोस्टातर्फे सांगण्यात आले, तर अजूनही खाते उघडण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांकडून सुरू आहे.
इन्फो :
५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त नागरिकांनी भरले हयातीचे प्रमाणपत्र :
पोस्ट पेमेंट बँकेमार्फत १ डिसेंबरपासून यूपीआयची सुविधा सुरू करण्यात आली असून, सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना कोरोना कालावधीत बाहेर जावे लागू नये म्हणून १ नोव्हेंबरपासून ‘हयातीचे जीवन प्रमाणपत्र’ जनरेट करण्याचीही सुविधा पोस्ट पेमेंट बँकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. या सुविधेमुळे आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त सेवानिवृत्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.