ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 7 - वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) अंमलबाजणीस एक महिन्याच्यावर कालावधी झाला असला तरी अद्यापही जळगावची बाजारपेठ यातून सावरलेली नाही. अद्यापही संभ्रम कायम असून लहान व्यावसायिक हवालदिल आहे. शहराच्या आर्थिक उलाढालीचा कणा असलेल्या सुवर्णबाजारात अजूनही मंदी असून पाईप उद्योग ठप्प झाला आहे. इतकेच नव्हे ब्रॅण्डेड डाळ बाजारात गायब झाली असून किराणा व्यावसायिकांची नवीन नियमावलींची माहिती घेण्याची धावपळ अद्यापही कायम आहे. ‘एक देश, एक कर’ या उद्देशाने देशातील विविध राज्यातील वेगवेगळे कर रद्द करीत 1 जुलैपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीस एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला आहे. या बाबत ‘लोकमत’ने बाजारातील स्थितीचा आढावा घेतला असता त्याचे वेगवेगळे परिणाम दिसून आले.
सुवर्णबाजारात शुकशुकाट कायमसुवर्णनगरी अशी ओळख ज्या व्यवसायामुळे जळगावची झाली आहे, तोच व्यवसाय सध्या मंदावला आहे. जीएसटीमध्ये अडकलेल्या या व्यवसायाची एक महिन्यानंतरही सुटका झालेली नाही. एरव्ही जुलै, ऑगस्ट महिन्यात या व्यवसायात मंदी असते. मात्र यंदा ही मंदी आणखी वाढून सुवर्ण व्यावसायिक हवालदिल झाल्याचे सराफ व्यवसायिक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गौतमचंद लुणिया यांनी सांगितले. कारागीरदेखील अजूनही काम करण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले. पाईप उद्योग ठप्पजीएसटीच्या अंमलबजावणीनंतर पाईप उद्योगामध्ये दोन प्रकारचे परिणाम दिसून आले. यामध्ये आंतरराज्य लागणारा कर लागत नसल्याने या फायद्यासह राज्यांच्या सीमेवरील तपासणीदेखील टळली आहे. मात्र वाहतूकदारांमध्ये असणारी भीती कायम असल्याने मालाची उलाढाल थांबली आहे. माल नेणारे वाहतूकदार जीएसटी क्रमांक असलेले पक्के देयके घेतल्याशिवाय माल नेण्यास तयार नाही. त्यात या प्रक्रियेला वेळ लागत आहे तर अनेक उद्योजक हे देयके देण्यास तयार असले तरी वाहतूकदार धास्तावलेलेच असल्याने याचा उद्योगावर परिणाम झाला असल्याचे उद्योजक अंजनीकुमार मुंदडा यांनी सांगितले. दाणाबाजार येतोय पूर्ववदावर 1500 वस्तूंची उलाढाल असलेल्या जळगावातील दाणाबाजारावर जीएसटीचा मोठा परिणाम झाला. आता महिनाभरानंतर ही स्थिती हळूहळू सुधारत आहे. अन्नधान्य, डाळी, कडधान्य बाजारात येऊ लागले आहे व ग्राहकीही पुन्हा इकडे वळत असल्याचे दाणा बाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी सांगितले. किराणा व्यावसायिकांची द्विधा अवस्थाजीएसटीतील वेगवेगळी नियमावली व त्या बाबत पुरेसी माहिती मिळविण्यासाठी किराणा व्यावसायिकांची धावपळ अद्यापही संपलेली नाही. मुळात अनेक किराणा व्यवसायिक हे माल आणून थोडय़ा नफ्यावर त्याची विक्री करीत असतात. मात्र आता सर्व गोष्टींची नोंद ठेवावी लागणार असल्याने सर्व प्रणाली नवीन करण्यासाठी तसेच ती हाताळता येते की नाही या विचाराने हे व्यावसायिक गोंधळलेलेच आहे. ही प्रक्रिया त्यांना क्लिष्ट वाटत असल्याने जीएसटी क्रमांक घ्यायचा की नाही, याच विचारात अनेक व्यावसायिक आहेत. अनेक व्यावसायिक ही प्रक्रिया पूर्ण करीत आहे, मात्र अनेक जण धास्तावलेलेच असल्याचे एकता रिटेल किराणा असोसिएशनचे ललित बरडिया यांनी सांगितले.कापड बाजारात ग्राहकी मंदावलेलीचजळगावातील कापड बाजारात नेहमी दिसणारी गर्दी ओसरलेली असून जीएसटीच्या एक महिन्यानंतरही हा व्यवसाय सावरलेला नाही. पूर्वी केवळ रेडिमेड कापडांवर कर लागत असे, मात्र आता शुटिंग, शर्टीगवरही 5 टक्के कर लागत असल्याने त्याचा परिणाम झाला असल्याचे कापड व्यावसायिक भरत समदडिया यांनी सांगितले. डाळीचा ब्रॅण्ड गायबदेशाच्या एकूण डाळ उत्पादनापैकी 50 टक्के वाटा असलेल्या जळगावातील डाळ उद्योगातून डाळीचा ब्रॅण्ड गायब झाला आहे. ब्रॅण्डेड डाळीवर पाच टक्के जीएसटी लावण्यात आल्याने हीच डाळ आता विना ब्रॅण्ड विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. या बाबत सरकारकडे लेखी निवेदन देऊन हा कर हटविण्याची मागणी करण्यात आली, मात्र महिन्यानंतरही हा प्रश्न कायम असल्याने ब्रॅण्ड न लावणेच पसंत केले जात आहे.वाहन बाजार स्थिरजीएसटीच्या अंमलबजावणीत दुचाकीवरील कर कमी होऊन किंमती कमी झाल्याने दिलासादायक बाब आहे. पूर्वी सर्व कर मिळून 30.5 टक्के कर लागत असे, मात्र आता 28 टक्के जीएसटी लागत आहे. त्यामुळे दुचाकींच्या किंमती कमी झाल्या आहे. महिनाभरात नेहमी सरासरी जेवढी वाहने विक्री होतात,तेवढी विक्री कायम असल्याचे महाव्यवस्थापक अमित तिवारी यांनी सांगितले.