चुडामण बोरसेआधी स्वत:विरुद्ध बंड, नंतर कुटुंबीय आणि नंतर समाजाविरुद्धही बंड केले या बंडातून आपण वेगळी वाट शोधली. लोकांना सजग करण्यासाठी आपण आता निघालो आहोत.. असे प्रतिपादन तृतीयपंथी कवयित्री दिशा शेख यांनी व्यक्त केले.जळगावच्या भालेराव प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी आंबेडकरी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिशा ह्या आज जळगावात आल्या होत्या. गंधे सभागृहात त्यांनी ‘ जयभीम’ म्हणत ‘लोकमत’शी संवाद साधला.प्रश्न: दिशा ते संघर्षशील कवयित्री दिशा शेख असा प्रवास कसा झाला.उत्तर: खरं तर ब्रेकअप नंतर वैयक्तीक आयुष्य हे आयुष्यच राहिले नाही, दु:खाची कारणे मीच स्वत: शोधत राहिली आणि मग मार्ग सापडत गेला. यातून बरेच काही शिकायला मिळाले. अजूनही शिकत आहे. ती एक न संपणारी प्रक्रिया आहे.. यातून मग कवयित्री दिशा शेख पुढे आली.. अशी अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणावे लागेल.प्रश्न: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्या विचारांचा प्रभाव आपल्या जीवनावर झाला?उत्तर : बाबासाहेबांच्या ‘समता’ या एकाच शब्दाने बरेच काही शिकविले. या शब्दाने जीवन कळले. त्याची व्यापकता मोठी आहे. जगण्याचा द्दष्टीकोन बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. पारंपारिक वाट सोडा आणि परिवर्तन घडवा. असे बाबासाहेब म्हणायचे. त्याच परिवर्तनाच्या वाटेवर आपण निघालो आहोत.स्वत:विरुद्ध बंडाने आपण वेगळ्या वाटेची सुरुवात केली. यामागे बाबासाहेब होेते. त्यांनीच बंड करायला शिकविले. यामुळे कवितेच्या ओळी लिहू लागली. कवितेनेच जीवनाला दिशा दिली.भारतीय संविधान हे लिंगभेद मानणारे नाही. लिंगविरहित संविधानाने व्यक्ती हा केंद्रबिंदू मानला आहे. या संविधानाचा आदर आणि सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचत गेली व मला उत्तरे मिळू लागली -दिशा शेख.
बंडातून वेगळी वाट शोधली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:29 AM