कृ षीवल समाज जीवनात शेती मशागतीसाठी जस-जसा यंत्राचा वापर वाढतोय तसतसा कृषी श्रमिकांच्या नात्यातील जिव्हाळा, जीवभाव कमी कमी होत चाललाय. जेव्हा शेती मशागतीसाठी यंत्रांचा वापर होत नव्हता, तेव्हा आठ-दहा बिघे जमिनीची नांगरणी करावयाची तर दोन माणसं-चार बैल आणि झालंच तर एक कुत्रा या सर्वांना शेतात रात्रीचा तळ ठोकून राबावे लागत असे. त्यामुळे नुस्त्या सहवासातूनही त्यांच्यात आपसूकच एक जिव्हाळ्याचं नातं जुळून येत असे. आता आठ दहा बिघे शेत जमिनीची नांगरणी ट्रॅक्टरच्या साहाय्याने करावयाची तर ती काही तासांत करता येते. यांत्रिकीकरणामुळे श्रम वाचले, मनुष्यबळही वाचलं. याळाचं काम पळात व्हायला लागलं हेदेखील खरं आहे, पण हे जेवढं खरं आहे. तेवढंच यांत्रिकीकरणामुळे कृषीवल जीवनातील जिव्हाळा, आत्मीयता आटत चाललीय हेदेखील तेवढंच खरं आहे. यांत्रिकीकरणाच्या आधी कृषीवल समाज जीवनात जे परस्परावलंबीत्व अनुभवण्यास येत होतं ते आता फारसं दिसत नाही. चार -सहा बिघ्यावाला, बैलांची केवळ एक जोडी बाळगून असणारा छोटा शेतकरी केवळ आपल्या बळावर शेतीची मशागत करू शकत नसे. मग असे दोन शेतकरी एकत्र येऊन दोघांनी मिळून दोघांच्या शेतीची मशागत करून घेत, त्याला ‘सायड’ म्हणत असत. या ‘सायड’च्या माध्यमातूनही दोन कुटुंबात घरोबा व्हायचा. कुटुंबातल्या माणसांची मनं जुळून यायची. त्यातूनच मग दोन कुटुंबात शेतातल्या शेंग भाजीची देवाणघेवाण व्हायची. त्याला ग्रामीण भाषेत ‘वानोळा’ असं म्हणतात. या वानोळ्याच्या माध्यमातूनही स्रेहाचे धागे जुळून यायचे घट्ट व्हायचे. आता यांत्रिकीकरणामुळे ‘सायड’ ही संकल्पना कालबाह्यच झाली आहे जवळजवळ. पूर्वीच्या काळी दोन छोटे छोटे शेतकरी जसे परस्परावर अवलंबून असत शेतीच्या मशागतीसाठी, तसे दैनंदिन जीवनात शेतकरी आणि शेतमजूरही परस्परांवर अवलंबून असत. पूर्वी शेतकऱ्यांकडे शेती मशागतीसाठी ‘सालदार’ महेनदार असत. नंतर सालदारकी, महेनदारकीची प्रथा संपुष्टात आली. मजूर शेतकºयांकडे हप्त्याने काम करायला लागले आणि आता तर चक्क रोजंदारीची पद्धत अस्तित्वात आली आहे. आता शेतकरी शेतीमशागतीसाठी शेतमजुरावर अवलंबून आहे, पण शेतमजूर मात्र शेतकºयावर अवलंबून नाही. आधी शेतमजूर कामाला सांगा म्हणून शेतकºयाच्या विनवण्या करत असे. आता शेतकरी कामाला ये म्हणून शेतमजुराच्या विनवण्या करायला लागला आहे. शेतकºयाला शेतमजुराची गरज आहे, पण शेतमजुराला शेतकºयाची गरज उरली नाही. त्यामुळेही शेतकरी व शेतमजूर यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यात अंतराय आलाय. पूर्वी दोघांत आदर, प्रेम, जिव्हाळा होता, आता उरलाय तो केवळ पैशांचा शुष्क, कोरडा व्यवहार, रोजंदारीवर काम करणाºया रोजदाराचे, सालदार महेनदारासारखे शेतकºयाशी, शेतकºयाच्या बैलांशी, गुरा वासरांशी भावबंध जुळून तरी कसे येणार? दीर्घकालीन सहवासाशिवाय भावबंध जुळणार तरी कसे? शेतमजुराच्या अभावामुळे त्रस्त झालेला शेतकरी म्हणूनच म्हणतोय, ‘बरं झालं बापा शेतीमशागतीसाठी यंत्र आली, नाही तर आता कोण शेतमजूर थांबला असता तळ ठोकून महिनाभर शेतात नांगरणीसाठी,’कृषीवल जीवनातील शेतकरी, शेतमजूर, बैल, गुरंवासरं एवढंच नाही तर शेतीची औजार यांच्यातील परस्पर स्रेहभाव प्रसंगोपात्त सहज नजरेत भरायचा. शेतकरी जसा सालदाराला, महेनदाराला अडीअडचणीला सांभाळून घ्यायचा, तशीच सालदार, महेनदारांची सही अन्नदाता म्हणून शेतकºयावर इमानी निष्ठा असायची. आपल्या स्वत:च्या मालकीची नसली तरी शेतकºयाच्या शेतीवाडीला, बैलांना, गुरांवासरांना सालदार, महेनदार शेतकºयाएवढाच जीव लावायचा, संध्याकाळी आपली बैलगाडी शेतातून घरी आली किंवा नाही हे शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यातील घाट्या घुंगराच्या आवाजावरून ओळखत असे. बैलांच्या गळ्यातील घाटा घुंगराचा आवाज जसा घरधन्याच्या ओळखीचा, तशी आपल्या गायीची हंबर घरधनीनच्या ओळखीची गुरांचा गोठा बहुधा घराला लागूनच घराच्या पाठीमागेच असे. उशिरा संध्याकाळी बैल शेतातून राबून घरी आल्यावर कंदीलाच्या उजेडात बैलांचा दानचारा व्यवस्थित झाल्याची खात्री झाल्याशिवाय शेतकरी रात्रीचं जेवण घेत नसत. ताटावर जेवायला बसल्यावरही पाळलेल्या कुत्र्याला भाकर टाकली की नाही याची चौकशी केल्यावरच घास तोंडात जायचा. गायीचे दूध काढायचे तर गाय कामावरच्या महेनदाराशिवाय दुसºया कुणाला कासेला हात लावू देत नसे. रात्रीचे जेवण झाल्यावर महेनदार उशिरा रात्री पुन्हा बैलांचा चारा सामोरा करायला यायचा. आला म्हणजे नुस्ताच चारा सामोरा करायचा नाही, तर त्यांच्याशी माणसांशी बोलायचा. किती जिव्हाळा, किती आत्मीयता, किती परस्पर प्रेमभाव, आपसूकच स्रेहबंध जुळून यायचे. आताशा असे स्रेहबंध जुळून यायला अवसरच उरला नाही. माणसातच जेथे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आत्मीयता उरली नाही तेथे पशुपक्ष्यांचा काय पाड?
फिके भावाविण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 3:14 PM