जळगाव : महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता यांना दोरीने बांधल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेले आमदार मंगेश चव्हाण व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांचे मोबाइलमध्ये व्हिडिओ चित्रण करणाऱ्या प्रवीण शिवाजी मराठे (४५,रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना खुर्चीला बांधून कार्यालयास कुलूप ठोकल्याप्रकरणी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सर्वांना त्याच दिवशी अटक करण्यात आली. दरम्यान, प्रवीण मराठे हा शनिवारी आमदार चव्हाण व सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आला होता. कोठडीत असलेल्या आमदारांशी चर्चा करीत असताना त्याने आपल्या मोबाइलमध्ये कोठडीचे व्हिडिओ चित्रण केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मराठे याला ताब्यात घेऊन मोबाइल जप्त केला. दरम्यान, पोलीस नाईक राजेंद्र यशवंत ठाकरे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण मराठे याच्याविरुद्ध शासकीय गोपनीयता अधिनियम १९२३ चे कलम ३ व ७ सह मुंबई पोलीस कायदा कलम १२० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे तपास करीत आहेत. दरम्यान, मराठे याने शासकीय गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी माहिती न्यायालयात पाठवण्यात आलेली आहे. संशयित मराठे याला नोटीस देऊन सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कोठडीतील व्हिडिओ चित्रण करणाऱ्या आमदाराच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 6:11 AM