लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : हिरवळ आणि निसर्ग सौंदर्याने बहरत असलेल्या अंबरीश महाराज टेकडीला कुणीतरी समाज कंटकांनी ३ व ४ रोजी दोन्ही दिवस आग लागल्याने अतिशय संतप्त भावना निसर्गप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.
हिरवळीने भरलेल्या श्री अंबरीश महाराज टेकडीवर ३ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत चार वर्षांपूर्वी अमळनेर येथील डॉक्टरांच्या आयएमए संघटनेच्या सहयोगाने लावलेली वड, पिंपळ, निंब आदी १५ ते २० फूट वाढलेली ३० झाडे या आगीत होरपळली.
नुकतीच या वृक्षांची पानझड होऊन पालवी फुटली होती. याठिकाणी वन्यजीव देखील असल्याने काही ससे व त्यांची पिल्लेदेखील भस्म झाली. याशिवाय वृक्षाला असलेली अनेक घरटी यात जळाल्याने पक्षांची पिल्लेही मरुन पडली. याठिकाणी १५ ते २० फूट पेटलेल्या गवतातही वणवा पेटल्याने सरपटणारे प्राणी यात जळून खाक झाले आहेत.
आगीमुळे टेकडीच्या निसर्गसौंदर्यालादेखील बाधा पोहोचली आहे. आगीची वार्ता शहरात पसरल्यानंतर निसर्गप्रेमींसह टेकडी ग्रुप सदस्यांनी लागलीच टेकडीवर धाव घेतली, तोपर्यंत नगर परिषदेचा अग्निशमन बंबदेखील पोहोचला. नितीन खैरनार व अग्निशामक दलाच्या मदतीने आग विझविण्यात आली. सुदैवाने टेकडीवर ही आग ब्रेक होऊन टेकडीच्या खाली न वळल्याने मोठे नुकसान टळले आहे.
तब्बल नवव्यांदा लावली आग
दि. ३ रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांनी फटाके फोडल्याने ही आग लागली. चार मुले पळाली तर ४ रोजीदेखील पुन्हा साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. त्यावेळी देखील काही तरुण तेथून पळाल्याचे समजले. याआधीदेखील आगीमुळे मोठे नुकसान वृक्षांचे झाले आहे.
टेकडीवर रिकामटेकड्यांना बंदी घाला
श्री अंबरीश महाराज टेकडीवर दररोज सकाळी टेकडी ग्रुपचे सदस्य रहात असल्याने झाडे सुरक्षित राहतात. मात्र दुपारी व सायंकाळी अनेक लफडेखोर, दारुडे आणि गंजोडे यांचा याठिकाणी राबता असतो. याशिवाय अनेकजण पार्ट्या खील उडवत असतात. त्यामुळेच असे कृत्य करणाऱ्यांना संधी मिळत आहे. टेकडी वाचवायची असेल तर प्रशासनाने टेकडीवर दुपारनंतर रिकाम टेकड्याना बंदी आणावी आणि विनापरवानगी होणाऱ्या पार्ट्या बंद कराव्यात, अशी मागणी टेकडी ग्रुपने केली आहे.