लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भंडारा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयही खळबळून जागे झाले असून, फायर ऑडिट आणि अन्य उपाययोजनांबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. यात नव्या इमारतींचे फायर ऑडिट करण्याची फाईल तपासण्यात आली आहे. लवकरच नव्या इमारतींचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती अधिष्ठाता डाॅ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली. मात्र, नवजात शिशू कक्षाचा आढावा घेतला असता, आग लागल्यावर काय? असे गंभीर चित्र याठिकाणी असल्याचे निदर्शनाला आले.
सहा सिलिंडर मुदतबाह्य
नवजात शिशू काळजी कक्ष, बालरोग विभाग आणि या कक्षांच्या खाली आग विझविणारे असे तेरा सिलिंडर लावण्यात आले आहेत. प्रत्येकाची मुदत ही तीन वर्षांची असते, मात्र, यातील सहा सिलिंडरची मुदत संपलेली आहे. यातील दोन सिलिंडर हे २००९ सालातील असून, त्यांना अक्षरश: जाळे लागलेले आहे. नवीन सहा सिलिंडर बसविण्यात आले आहेत. नवजात शिशू काळजी कक्ष आणि बालरोग विभागात हे सिलिंडर बसविण्यात आले आहेत.
सिलिंडर आहे हाताळणार कोण?
नवजात शिशू काळजी कक्ष आणि प्रसुती कक्षाबाहेरील नियुक्त महिला कर्मचाऱ्याला या सिलिंडरबाबत कसलीच माहिती नसून, त्यांचा वापरच होत नाही. त्यामुळे त्यात काही आहे किंवा नाही, हे माहीत नसल्याचे या कर्मचारी महिलेने सांगितले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे का, हाही एक गंभीर मुद्दा उपस्थित झाला असून, आग लागल्यास काय, असे प्रश्नचिन्ह यामुळे उपस्थित झाले आहे.
सुरक्षा ऑडिटही नाही
रुग्णालयाचे सुरक्षा ऑडिट करावे, असे पत्र अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तत्कालिन पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांना दिले होते. मात्र, हे ऑडिट न झाल्याने अखेर स्थानिक पातळीवरच सुरक्षेचे नियोजन करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.
मॉक ड्रीलमध्ये हे करणार
रुग्णालयात अचानक आग लागल्यास काय करायचे, याबाबत एक मॉक ड्रील घेण्यात येणार आहे. यात काय दक्षता घ्यावी, आग विझविणाऱ्या सिलिंडरने आग कशी विझवावी, कोणत्या मार्गे बाहेर पडावे, गंभीर रुग्णांना कसे हलवावे, या बाबी यात तपासल्या जाणार आहेत. येत्या एक-दोन दिवसात हे मॉक ड्रील घेणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी सांगितले.
कोट
शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू कक्षात २५ बालके दाखल आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सहा अग्निशमन मशीन कक्षामध्ये कार्यान्वित आहेत. तसेच तत्काळ सेवेसाठी २४ तास डॉ्क्टर, परिचारिका व कर्मचारी असतात.
- डॉ. जयप्रकाश रामानंद, अधिष्ठाता