जळगाव : अजिंठा चौक परिसरातील इदगाह व्यापारी संकुलाला लागून असलेल्या भंगार बाजारातील टायर गोदामाला बुधवारी सकाळी १० वाजता आग लागली. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. टायरमुळे आगीने रौद्र रुप धारण केले होते. टायर गोदामासह शेजारीच असलेल्या प्लायवूड व बाटल्यांच्या गोदामाला देखील याची झळ बसली आहे. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
हबीब खान मोहब्बत खान यांच्या मालकीचे गोदाम असून त्यात जुने व भंगार टायर साठविण्यात आलेले होते. त्यांच्याच शेजारी शेख मेहमूद यांच्या मालकीचे जुन्या बाटल्यांचे गोदाम आहे. दुसऱ्या बाजुला प्लायवूडची खोली आहे. या आगीत तिघं दुकानातील वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाचे पाच बंब यावेळी मागविण्यात आले होते. या भागात रहिवास नसल्याने मोठा धोका टळला.
दुकानातून धूर निघत असल्याचे दहा वाजता शेजारी लोकांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळाल्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नीलेश गोसावी, गोविंदा पाटील व मुदस्सर काझी यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी मनपा अग्निशमन दलाला पाचारण केले होते.