जळगाव : तहसील कार्यालयातील जुने रेकॉर्ड असलेल्या दोन खोल्यांमध्ये सोमवारी रात्री ११ वाजता अचानक आग लागली. यात निवडणुकीशी संबंधित जुने रेकॉर्ड जळून खाक झाले आहे. दरम्यान, शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीला लागून असलेल्या तहसील कार्यालयातील इमारतीतून धुर निघत असल्याचे जि.प.च्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले. त्यानंतर तातडीने यंत्रणा हलली. अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रांताधिकारी दीपमाला चौरे, तहसीलदार वैशाली हिंगे, महसूलचे नायब तहसीलदार सी.एम.सातपुते, हेंमत पाटील आदींनी तहसील कार्यालयात धाव घेतली. आग लागलेल्या खोलीची पाहणी केली असता त्यातील सर्व कागदपत्रे, फाईल्स जळून खाक झाल्या होत्या. तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. याच खोलीला दोन वर्षापूर्वी आग लागली होती, अशी माहिती तहसीलदार हिंगे यांनी पत्रकारांना दिली.काकांचे निधन..पण आधी कर्तव्याला प्राधान्यअग्निशमन अधिकारी शशिकांत बारी तसेच फायरमन भारत जगन्नाथ वाणी हे दोघंही सोमवारी रात्री ड्युटीवर होते. दोघांचे काका प्रभाकर झावरु बारी यांचे जुने जळगावात रात्री १०.४५ वाजता निधन झाले. त्यांच्याकडे जाण्याची तयारी करीत असतानाच तहसील कार्यालयाला आग लागल्याचा दूरध्वनी खणखणला..काय निर्णय घ्यावा या पेचात अडकलेल्या शशिकांत व भारत बारी यांनी काकांकडे जाणे टाळून आधी कर्तव्याला प्राधान्य देत पाण्याचे दोन बंब घेऊन घटनास्थळ गाठले. यावेळी पाण्याचा मारा करताना भारत बारी यांना विजेचा धक्का लागला. त्यांनी तात्काळ कनेक्शन बंद केले. यात ते बालंबाल बचावले.शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागली आहे. ज्या खोलीत ही आग लागली, त्यात महत्वाचे कागदपत्रे नव्हते. रद्दीच्या स्वरुपातील कागदपत्रे होती. मात्र, तरीपण सकाळीच काय तो उलगडा होईल.-वैशाली हिंगे, तहसीलदार