जळगाव : एमआयडीसी परिसरातील डी सेक्टरमध्ये असलेल्या मनोहरलाल जमनदास यांच्या मालकीच्या लिड्स स्केम या केमिकल कंपनीला मंगळवारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत कंपनीच्या परिसरातील लाकूड व गवत जळून खाक झाले. ही कंपनी अनेक वर्षांपासून बंद आहे, त्यामुळे कुठलीही हानी झाली नाही.
कंपनीच्या मागे रामेश्वर कॉलनीचा रहिवासी परिसर आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाकूडदेखील असल्याने परिसरातील वाढलेल्या गवताला आग लागली. अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी प्रकाश चव्हाण, पन्नालाल सोनवणे, नितीन बारी, गंगाधर कोळी यांनी तत्काळ बंब घेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अर्धा तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.