लोकमत न्यूज नेटवर्क
बिडगाव, ता.चोपडा : चोपडा यावल रावेर परिसराला विस्तीर्ण असा सातपुडा पर्वत लाभला आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वसंत ऋतूची चाहूल लागताच या वनास वणवा लागण्याची दुर्दैवी मोहीम सुरू झाली असून काल दुपारपासून अडावद वनक्षेत्र हद्दीतील वरगव्हाण महामंडळाच्या कक्ष क्र.५६ मध्ये सलग २० तासांहून अधिक काळापासून वणव्याचा भडका सुरू असून यात लाखो रूपयांची वनसंपत्ती जळून खाक झाली आहे.
अडावद वनक्षेत्र हद्दीतील वरगव्हान परिमंडळाच्या कक्ष क्र.५६ मध्ये शनिवारी दुपारपासून जोरदार वणवा लागला. दिवसा न दिसणारा हा वणवा रात्री २०ते २५ कि. मी.वरून दिसत होता. रात्रीसुद्धा सलग सुरू असलेल्या हा वणवा दऱ्यांखोऱ्यांच्या भागात असल्याने वनविभागाचे विझवण्याचे प्रयत्न तोकडे ठरत होते. त्यामुळे या वनातील अनमोल अशी लाखो करोडो रूपयांची अनमोल अशी वनसंपदा जळून खाक होत असल्याने वनप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.
महाष्ट्राच्या चोपडा, यावल, रावेर या तालुक्यांना निसर्गाने भौगोलिकदृष्ट्या अनमोल अशी देणगी म्हणून लाभलेल्या सातपुडा जंगलाला जंगल तस्करांची वक्रदृष्टी व वन अधिकाऱ्यांच्या वेळकाढू भूमिकेमुळे ग्रहण लागले आहे. चोपडा तालुक्याच्या अडावद हद्दीतील वरगव्हाण परिमंडळात अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी वणवा लागून आगीत लाखो करोडो रूपयांची अनमोल अशी वन, वृक्ष व खनिज संपत्तीची नष्ट होत आहे. जंगलातील विस्तीर्ण असे वनपट्टेच्या पट्टे नष्ट होत आहे. हे सगळे चित्र वनअधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहूनही थातूरमातूर उपाययोजना व अपूर्ण सुविधा यामुळे वेळ मारून नेत असल्याने जंगलात जेमतेम असलेली वनसंपत्ती, प्राणी, वनऔषधी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.