जळगाव : उसनवारीचे उर्वरीत सहा हजार रूपये मंगळवारी देतो असे सांगून देखील राहूल मधुकर शिंदे (वय-२२, रा़ योगेश्वर नगर) या तरूणाच्या अंगावर व डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ३़३० वाजेच्या सुमारास गोपाळपुरा परिसरात घडली़ जखमी तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहे़ डोळ्यांची प्रचंड जळजळ व अंगाची आगआग होत असल्याने हा युवक वेदनेने ओरडत होता. राहुल शिंदे या जखमी तरूणाने दिलेली माहिती अशी की, योगेश्वर नगरात तो पत्नी, आई-वडील तसेच भावासह वास्तव्यास आहे़ आर्थिक अडचणी असल्यामुळे विक्की नामक तरूणाकडून त्याने उसनवारीने १६ हजार रुपये घेतले होते. नंतर दोनवेळा पाच-पाच हजार करून १० हजार रूपये विक्कीला परतफेड केली़ उर्वरित सहा हजार रूपयांची रक्कम मंगळवारी राहूल देणार होता़ मात्र, शुक्रवारी विक्की याने राहूल याला फोन करून पैशांची मागणी केली़ मंगळवारी तुझे पैसे देणार आहे, असे त्याने सांगितले़ परंतू, तु मला भेटण्यासाठी का.ऊ.कोल्हे शाळेजवळ ये असे विक्कीने सांगितल्यामुळे राहुल हा त्याला भेटण्यासाठी शुक्रवारी दुपारी शाळेजवळ गेला़ राहूल हा त्याठिकाणी आल्यानंतर विक्की व त्यासोबत असलेल्या दोन तरुणांनी राहूलला गोपाळपुऱ्यातील पुलाजवळील खळ्यात नेत त्याला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली़ त्यानंतर बेदम मारहाण केली़ दुकानातून घेतली मिरची पूड गोपाळपुरा पुलाजवळील खळ्यात राहुलला नेल्यानंतर त्या दोन तरूणांनी त्याला पकडून ठेवले़ नंतर विक्की याने दुकानातून मिरचीची पूड आणून राहूलच्या अंगावर, डोळ्यात तसेच पाठीवर व कमरेखालच्या भागाला लावत त्याच्या पायाला आणि हाताला लाकडी दांड्याने मारहाण केली़ या मारहाणीत त्याला मोठी दुखापत झाली़ अन् तो चुकवत होता पायावर पडणारी विट तिखट मिरची अंगाला लागली असल्यामुळे संपूर्ण शरीराची आगआग होत होती़ दुसरीकडे विक्की व त्याच्यासोबतचे साथीदार त्याच्या पायावर विट मारीत होते़ दुखापत होण्याच्या भितीने राहूल हा त्याच्या पायावर येणारी विट चुकवित होता़ हा संपूर्ण प्रकार राहूलच्या मित्रासमोर सुरू होता़ तो देखील त्याला मारहाण करू नका अशी विनंती करीत होता़ पण, त्याचे कुणीही ऐकत नव्हते़ राहूल याला मारहाण होत असल्याने त्याठिकाणी असलेल्या त्याच्या मित्राने मध्यस्थी करीत राहूलला विक्कीच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर त्याला घरी घेवून गेला़ घरच्यांना संपूर्ण हकिकत सांगितल्यानंतर कुटूंबीयांनी तात्काळ पोलिसात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी राहुलला होत असलेल्या वेदना पाहून आधी वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला़ त्यामुळे सायंकाळी त्याला जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़ तेथेही त्याला प्रचंड त्रास होत होता. अंगाला लावलेली मिरची पूड आणि नंतर झालेल्या मारहाणीमुळे अंगाची प्रचंड आगाआग होत असल्याचे राहूलला मरणप्राय यातना होत होत्या. अशाही स्थितीत तो आपबिती कथन करत होता. दरम्यान, पैसे मंगळवारी देणार असताना सुध्दा मारहाण झाल्यामुळे कुटूंबीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली़
आधी अंगाला लावली मिरची पूड, नंतर केली लाकडी दांड्याने मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:51 PM