रावेर : दुसऱ्या दादल्याचा घरोबा करून संपत्ती हडपण्यासाठी पहिल्याचा दोघा पती-पत्नीने खून केल्याची घटना सातपुड्याच्या पायथ्याशी गंगापुरी धरण परिसरात १५ दिवसांपूर्वी घडली. विहिरीत टाकलेला मृतदेह तीन दिवसांनी वर तरंगला तर नाल्याच्या पात्रात खड्डा खोदून पुरवून पुरावा केला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. खुनासह पुरावा नष्ट करण्याच्या गुन्ह्यात आरोपीचे भाचेजावई व त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सातपुडा पर्वताच्या पलीकडे पर्वतराजीत वसलेल्या बसाली (ता. जि. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) येथील प्रताप खुमसिंग भिल (वय ४६) याचा सागरीबाई हिच्याशी विवाह झाला होता. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी त्याची पत्नी सागरीबाई हिने त्याच्याशी सोडचिठ्ठी करीत नेपानगर तालुक्यातील १०० एकरांचा जमीनदार असलेल्या लक्ष्मण वेरसिंग भिल या विवाहित शेतकऱ्याशी दुसरा विवाह केला. पहिली पत्नी जवळ असताना या दुसऱ्या पत्नीचाही तो सांभाळ करीत होता.
दरम्यान, संसाराची राखरांगोळी झाल्याने प्रताप खुमसिंग भिल (वय ४६) हा अहिरवाडी शिवारातील सदाशिव पाटील यांच्या शेतात शेतमजुरीसाठी वास्तव्यास होता. दरम्यान, प्रताप भिल याचा मोठा भाऊ व आईवडील मयत असल्याने सागरीबाई हिचा पत्नीचा हक्क कायम ठेवत त्याची वारसदार म्हणून त्याच्या मालकीची वनदाव्याने प्राप्त झालेली बसाली शिवारातील २० एकर बागायती शेतजमीन हडपण्यासाठी त्याचा काटाच काढण्याचे कटकारस्थान त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सागरीबाई व तिचा दुसरा दादला लक्ष्मण वेरसिंग भिल यांनी रचले.
प्रताप भिल याची पूर्वाश्रमीची पत्नी सागरीबाई व तिचा दुसरा दादला लक्ष्मण वेरसिंग भिल त्याचा भाचेजावई झिंगल्या शहादा भिल व त्याचे साथीदार इस्माईल हसन तडवी व महेबूब कासम तडवी या पाचही आरोपींनी बांबूच्या काठ्यांनी प्रताप भिल याच्या डोक्यात जबर मारहाण केली तर झिंगल्या शहादा भिल याने त्याचा ठिबक सिंचनाच्या नळीने गळा आवळून त्याची अमानुषपणे हत्या करीत त्याचा मृतदेह विहिरीत फेकून दिला.
दरम्यान, मयताचा भाऊ भारत खुमसिंग भिल याच्या फिर्यादीवरून रावेर पोलिसात मयताची पूर्वाश्रमीची पत्नी, तिचा दुसरा पती, त्याचा भाचेजावई व त्याचे तीन आप्तेष्ट व त्याचे पाडळे येथील दोन साथीदार अशा आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत गुन्हा शोध पथकाने पसार झालेले आरोपी सागरीबाई व तिचा दुसरा पती लक्ष्मण वेरसिंग भिल रा. रोहिणी, ता. नेपानगर यांना बोरी बु. येथील आठवडे बाजारातून अटक केली. पोलीस उपअधीक्षक विवेककुमार लावंड व पो. नि. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.