चाळीसगाव : डेल्टा प्लस या नव्या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमांची जारी केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी रविवारी सकाळपासून सुरू होताच नागरिक व व्यापारीवर्गात गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. नेहमीप्रमाणे व्यापारी व दुकानदारांनी रविवारी सकाळी आपापली दुकाने सुरू केली होती. पोलिसांनी शहरातील प्रमुख रस्त्यावर वाहनातून स्पीकरद्वारे अत्यावश्यक दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यासाठी आवाहन केल्यानंतर काही वेळेतच दुकाने पटापट बंद झाली. मात्र काही ठिकाणी दुपारी चार वाजेनंतर काही दुकाने उघडी दिसून आली.
डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता जिल्हाधिकारी जळगाव यांनी २७ पासून नवीन निर्बंध लागू केले आहेत. यापूर्वी जळगाव जिल्ह्याचा पहिल्या टप्प्यात समावेश झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले होते. मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्याचा तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आल्याने जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील नवीन आदेश जारी केले आहेत.
चाळीसगाव शहरातील रेल्वे स्टेशन परिसर, स्टेशनरोड, सिग्नल चौक, गणेशरोड, बाजारपेठ, भडगावरोड आदी प्रमुख मार्गावरील दुकाने रविवारी बंद होती.
फेरीवाले, वाहतूक मोकटच
दुकानदार,व्यापाऱ्यांवर कडक निर्बंध असताना रस्त्यावरील विक्रेते आणि फेरीवाल्यांवर कारवाई केली जात नसल्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. रविवारी रस्त्यावरील फेरीवाल्यांचा धंदा नियमितपणे सुरूच होता. रिक्षावालेही सर्रास प्रवासी घेत होते. रस्त्यावर ठिकठिकाणी गर्दी दिसत होती.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला खो
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने चार वाजेनंतर पूर्णतः बंद राहतील, असे जिल्हाधिकारी जळगाव यांनी शनिवारी नवीन आदेश काढले असताना रविवारी दुपारी चार वाजेनंतर शिवाजी घाट परीसरातील, गणेशरोडवरील भाजीपाला विक्रेते सर्रास भाजीपाला विक्री करीत होते. स्टेशनरोडवरील व इतर भागातील किराणा दुकाने व इतर दुकानेही उघडी होती.
बस स्टॅन्ड परिसर रविवारी दुपारी चार वाजेनंतर गर्दीने वेढलेला दिसला. या परिसरात ठिकठिकाणी लहान-मोठी दुकाने भररस्त्यावर सुरूच होती.
भडगावरोडवरील कॅप्टन कॉर्नर, राष्ट्रीय वसतिगृह जवळील हॉटेल, फ्रूट दुकाने व इतर दुकानेही सुरू होती.