रुग्णालयात गर्दी
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठातांच्या कार्यालयाबाहेर अनेक नातेवाईक बसत असल्याचे चित्र असून रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी वाढली आहे. सोमवारी दुपारीही या ठिकाणी काही नातेवाईक डबा खात असताना अचानक जिल्हाधिकारी आल्याने सुरक्षा यंत्रणेची तारांबळ उडाली होती. त्यांनी तातडीने या नातेवाइकांना या ठिकाणाहून हलविले.
बांधकाम विभागात गर्दी
जळगाव : मार्चअखेर असल्याने बांधकाम विभागात सोमवारी मोठी गर्दी उसळली होती. जिल्हा परिषदेत कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढला असताना बांधकाम विभागातील गर्दीवर मात्र नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी एका दिवसासाठी हा विभाग बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतरही एक कर्मचारी या ठिकाणी बाधित आढळून आला होता. मात्र, गर्दी कमी होत नसल्याचे चित्र आहे.
ग्रामीणमध्ये संसर्ग
जळगाव : जळगाव ग्रामीणमध्येही संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील गावांमध्ये ५० किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण सातत्याने समोर येत आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ३०० च्या वर पोहोचली आहे. तालुक्यात मध्यंतरी कोरोना चाचण्यांचे प्रमाण कमी झाले होते. रुग्णांचे प्रमाणही अगदी कमी होती. सक्रिय रुग्णांची संख्या चार ते पाचवर आलेली होती.
धुळीचा त्रास
जळगाव : शहरातील अंतर्गत रस्त्यांवर धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले असून सोमवारी वादळसदृश परिस्थिती उद्भवल्याने याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे नेरीनाका ते अजिंठा चौफुली या रस्त्यावर सर्वाधिक वर्दळ असल्याने या रस्त्यावर धुळीचे अक्षरश: लाेळ उठले होते. यामुळे वाहतूककोंडीही झाली होती.