लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या चौथ्या टप्प्याला गुरूवारी सुरूवात झाली आहे. यात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना लस दिली जात असून पहिल्या दिवशी जिल्ह्यातील १२६५ लोकांनी ही लस घेतली. यात जळगाव शहरात मात्र, कमी प्रतिसाद मिळाला. अन्य केंद्रांवरही कमी अधिक प्रमाणात लसीकरण झाले. यात दिवसभरात एकत्रित २१८९ नागरिकांना लस देण्यात आली.
कोरोनाचा चौथा टप्पा सुरू झाल्याने जळगाव शहरात आता कोरोना लसीकरणाचे महापालिकेकडून चार केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यात गुरूवारपासून चेतनदान मेहता या महापालिकेच्या रुग्णालयात लसीकरणाला सुरूवात झाली. यात शाहू महाराज रुग्णालय वगळता डी. बी. जैन रुग्णालय, नानीबाई रुग्णालय व चेतनदास मेहता रुग्णालयात कोविशिल्ड लस उपलब् आहेत. निकषात बसणाऱ्या नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.
असे झाले आहे लसीकरण
जिल्ह्यात एकूण १ लाख २९ हजार ६७८ लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला असून यातील १६ हजार ४२४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षावरील अन्य व्याधी असलेल्या अशा ९८ हजार ५४५ लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.