दीपनगर, ता. भुसावळ : फेकरी ग्रामपंचायतीत २७ रोजी शुक्रवारी सकाळी नवनिर्वाचित सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रामसभा होणार होती आणि या सभेची दवंडी एक दिवस आधीच दिलेली असताना कोरमअभावी सभा रद्द झाली.
सभेला ग्रामस्थांच्या प्रश्नांवर उत्तर देणारे विविध शाखांचे अधिकारी व नागरिकांच्या पुरेशा संख्येअभावी सभा झाली नाही.
ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामसभा तहकूब (रद्द) का केली, असा प्रश्न सरपंचांनी केला असता, तेथील वातावरण काही काळ तापले होते. यावेळी तालुक्याचे पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मध्यस्थी करीत वातावरण शांत केले.
ग्रामसभा ही ग्रामस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी व शासनाच्या नवीन योजनांची ग्रामस्थांना माहिती आणि लाभ मिळवण्यासाठी असते. तरी रद्द झालेली ग्रामसभा दिनांक ३० रोजी सोमवारी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत पटांगणात होणार आहे.
या सभेत पुढील विषय असे की, मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून मंजूर करणे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कृती आराखडा तयार करणे, १५ वा वित्त आयोग सन २०२१/२२ चा कृती आराखडा कार्योत्तर मंजुरी घेणे आदी विषयांसह विविध उपसमित्या स्थापन करायच्या आहेत. यात ग्रामीण पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य समिती, तंटामुक्त गाव मोहीम समिती, बाल हक्क संरक्षण समिती, जैवविविधता समिती, ग्राम दक्षता समिती आदी समित्यांचा समावेश असून विविध योजनांचे लाभार्थी निवड करणे (समाज कल्याण व इतर योजना) व आलेल्या अर्जांवर विचार करणे, जि. प. मराठी शाळा, उर्दू शाळा, प्राथमिक उपकेंद्र, रेशन दुकानदार, रॉकेल हॉकर्स इत्यादी शासकीय योजनांचा आढावा घेणे आदी विषय सभेत घेतले जाणार आहेत. ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून ग्रामसभा यशस्वी करावी, असे सरपंच चेतना भिरुड यांनी आवाहन केले आहे.