लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लाख रुपये देवून विवाह झाला परंतु लग्नाच्या दुस-याच दिवशी नववधू रफुचक्कर झाली. पैसे ही गेले आणि पत्नीही सोडून गेली या नैराश्यातून कुसुंबा येथील तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लग्नासाठी पैसे घेवून मध्यस्थी करणा-या दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तब्बल तीन ते चार महिन्यानंतर उज्जला उर्फ संगीता उर्फ उजी अनिल गाढे (२५, रा.विवरा, ता.रावेर) या फरार नववधूस पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरातून शनिपेठ पोलिसांनी अटक केली आहे़ तिला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील कैलास संतोष चावरे हा गेल्या १२ वर्षांपासून जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील बहिणीकडे वास्तव्यास होता. दोन महिलांनी कैलासकडून विवाहासाठी एक लाख रुपयांची रक्कम घेत त्याचा उज्ज्वला गाढे हिच्यासोबत दुुसरा विवाह लावूून दिला होता. परंतु लग्नाच्या दुस-याच दिवशी नववधू रफूचक्कर झाल्याची घटना ३१ जुलै रोजी घडली होती. त्यानंतर मध्यस्थी महिलांनी पैसे मिळणार नाही, असे सांगताच कैलास चावरेंनी त्या महिलांच्या घराजवळ विष प्राशन केले होते. त्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लिलाबाई रामनारायण जोशी व पदमा सुधाकर खिल्लारे उर्फ संगीताबाई रोहिदास भालेराव उर्फ संगिता रमेश पाटील यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होता.
पहाटे ५ वाजताच केली अटक
रफूचक्कर झालेली नववधू पुणे येथील रांजणगाव एमआयडीसीत असल्याची माहिती शनीपेठ पोलिस पोलिसांना मिळाली. सोमवारी पहाटे ५ वाजता ती घराबाहेर जाणार तोच, तिला पोलीस कर्मचारी दिनेशसिंग पाटील, रवींद्र पवार, अभिलाषा मनोरे, अनिल कांबळे, सलिम पिंजारी, रवींद्र पाटील यांच्या पथकाने तात्काळ अटक केली. त्याठिकाणी ती प्रियकरासोबत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली़
तीन दिवसांची पोलीस कोठडी
याप्रकरणात पूर्वी अटकेत असलेल्या लिलाबाई उर्फ भाभी व संगीता उर्फ उज्वला या गेल्या ७ सप्टेंबर पासून न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान फरार नववधू उज्ज्वला गाढे हीला शनीपेठ पोलिसांनी अटक केल्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केले. तिला सुनावणीअंती तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पहिल्या पतीला धोका अन् तो झाला मनोरूग्ण
उज्ज्वला गाढे हिने काही वर्षांपूर्वी रावेर तालुक्यातील विवरे येथील सचिन पाटील याच्यासोबत विवाह केला होता. उज्ज्वला ही सचिनसोबत मुक्ताईनगर येथे राहत होती. सचिनला दारुचे व्यसन असल्याने उज्ज्वलाचे याच गावातील आकाश भागवत बोदडे याच्यासोबत सूत जुळले़ नंतर तिने पतीला सोडले़ आपल्या पत्नीचे दुसºयासोबत प्रेमसंबंध असल्यामुळे सचिन पाटील हा वैफल्यग्रस्त झाला. तो मुक्ताईनगरात मनोरुग्ण म्हणून वावरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
प्रियकराविरुद्ध दिली अत्याचाराची तक्रार
उज्ज्वला गाढे या विवाहितेचे मुक्ताईनगरात राहणाºया आकाश बोदडे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, आकाशने मी तुझ्याशी लग्न करतो असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी उज्ज्वलाच्या तक्रारीवरुन मुक्ताईनगर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्यानंतर आकाश याला अटक झाली होती. चार महिने कारागृहात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती. दरम्यान, सोमवारी रांजणगाव येथून उज्ज्वला हिला अटक केल्यानंतर ती ज्या प्रियकराविरूध्द अत्याचाराची तक्रार दिली. त्याच्यासोबतच राहत असल्याचे पोलिसांना आढळून आले.
प्रियकराच्या वडिलांनी केली आत्महत्या
आकाशविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने याप्रकरणात चार महिने कारावासाची शिक्षा भोगली. दरम्यान, मुलाविरूध्द गुन्हा दाखल झाला व समाजात झालेली बदनामीमुळे त्याच्या वडिलांनी देखील आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.