राज्य शासनाने २०२०-२१या वर्षात माझी वसुंधरा अभिमान स्पर्धा राबविली. यात राज्यातील २९१ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला. दहा हजार लोकसंख्यावरील गावे यात सहभागी झाले . पर्यावरण दिनाच्या निमित्ताने स्पर्धेचा निकाल मुंबई येथील मंत्रालयातून ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या कार्यक्रमात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संजय बनसोडे, विभागाच्या प्रधान मनीषा म्हैसकर यांची ऑनलाइन उपस्थिती होती.
निसर्गाशी संबंधित अग्नी, वायू, जल, भूमी व आकाश या पंच तत्त्वावर आधारित उल्लेखनीय कामगिरी पेठ ग्रामपंचायतीने आठ महिन्यांत केली. यासाठी सरपंच नीता पाटील, उपसरपंच श्यामराव सावळे, माजी जि. प. सभापती व विद्यमान ज्येष्ठ सदस्य प्रदीप लोढा, माजी जि. प. सदस्य राजधर पांढरे, जीवन पाटील यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एन. पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
जामनेर पालिका नाशिक विभागात पहिली
जामनेर : माझी वसुंधरा अभियान २०२०-२१ अंतर्गत घेण्यात आलेल्या नगर परिषद गटात जामनेर पालिकेस तृतीय क्रमांक व नाशिक विभागात प्रथम क्रमांक मिळाला. शनिवारी झालेल्या ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळ्यात नगराध्यक्ष साधना महाजन, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे सहभागी झाले होते. सुरज पाटील, अनुजा जैस्वाल, दत्तू जोहरे, संदीप काळे उपस्थित होते.