लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव- शहर मनपाच्या महापौर म्हणून भारती सोनवणे यांचा कार्यकाळ अल्प शिल्लक राहिला असून, याआधी महापौरांकडून पहिल्या टप्प्यात कोरोना झालेल्या नागरिकांशी संवाद साधला जात आहे. आतापर्यंत २५०० जणांशी संपर्क साधला गेला आहे.
शहरात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असून महापौर भारती सोनवणे यांच्यासह त्यांच्या कार्यालयातून दररोज विविध क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला जातो आहे. नाट्यकर्मी, व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक व्यक्तींशी संपर्क करीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वेळोवेळी साबणाने हातपाय धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींशी देखील संपर्क केला जात असून त्यांना देखील खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. कोरोनामुळे काय त्रास होतो याची इतरांना जाणीव करून देत कोरोना योद्धा म्हणून भूमिका बजावण्याचे आवाहन महापौर भारती सोनवणे यांच्याकडून केले जात आहे. आजवर २५०० पेक्षा अधिक व्यक्तींशी संपर्क करण्यात आलेला आहे.