लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यासह शहरात शनिवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे महावितरण व मनपा प्रशासनाने केलेल्या मान्सूनपुर्व कामांचे पुर्णपणे पितळ उघड पडले आहे. खराब रस्त्यांमुळे जळगावची झालेली धुळगाव अशी ओळख पहिल्याच पावसाने पुसून टाकत, शहरात सर्वत्र चिखल तयार झाला. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर चिखल झाल्यामुळे पायी चालणेही कठीण झाले आहे.
शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे निवृत्ती नगर भागातील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी घुसले, तर अनेक ठिकाणी रस्त्यांवर नेहमीप्रमाणे पाणी साचले. शनिवारी मध्यरात्री २.३० वाजेच्या सुमारास शहरात सुसाट्याचा वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम परिसर, नवीन बीजे मार्केट परिसरातील अप्पा महाराज समाधी समोरील रस्त्यालगत देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यासह गुजराल पेट्रोलपंप परिसर, शिवाजीनगर, अग्रवाल चौक, एसएमआयटी महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. महापालिका प्रशासनाकडून नाले दुरुस्तीचे काम देखील अद्याप पूर्ण झालेले नसल्याने, लेंडी नाला परिसराला लगत असलेल्या शनिपेठ भागातील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात नाल्याचे पाणी आल्यामुळे या ठिकाणी गाळ साचला होता.
चिखल, खड्डे अन् पुन्हा हाल
गेल्यावर्षी मनपा प्रशासन व सत्ताधा-यांच्या ढीम्म कारभारामुळे रस्त्यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. त्यात महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे यंदा ही परिस्थिती सुधारेल असे वाटत होते. मात्र, अनेक भागांमध्ये अनेक वर्षांपासूनची समस्या यंदाही कायम असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शनिपेठ भागाकडून ममुराबाद कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत अमृत योजनेसाठी खोदण्यात आलेला रस्त्याची दुरूस्ती न केल्यामुळे या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात चिखल झाला होता. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागली. अनेक वाहनधारक या चिखलामुळे खाली देखील कोसळले. या भागासह इंद्रप्रस्थ नगर, चौगुले प्लॉट परिसर, शिवाजीनगर, दूध फेडरेशन परिसर, शाहू नगर, जुने जळगाव परिसर, कांचन नगर, गोपाळपुरा या भागात देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील कठीण झाले होते.
रस्ते दुरुस्तीचे काम रखडल्याने जळगावकरांची वाट बिकटच
महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. अनेक भागात रस्ते दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी शहरातील काही भागांमध्ये अद्यापही रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षी देखील जळगावकरांच्या नशिबी चिखल, खड्डेच कायम राहणार आहे. त्याचा प्रत्यय शनिवारी रात्री झालेल्या पावसात दिसूून आला. मेहरून, पिंप्राळा, अयोध्या नगर परिसर व कानळदा रस्त्यालगत देखील मोठ्या प्रमाणात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांचे चांगलेच हाल झाले. तर काही भागात रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू असून याठिकाणी टाकण्यात आलेल्या मुरूम पावसामुळे रस्त्यावर पसरला होता. यामुळेही वाहनधारकांना काही प्रमाणात त्रास झाला.
हरिविठ्ठल नगर परिसरात कोसळली वीज
शनिवारी रात्री झालेला वादळी पावसासह विजांचा कडकडात देखील मोठ्या प्रमाणात झाला. शहरातील हरीविठ्ठलनगर जवळील मुकुंदनगर भागात रामविलास इंगळे यांच्या घरावर कोसळली वीज. घराचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान. भीतीला तडे, घरातील इन्व्हर्टरसह उपकरणांचे नुकसान झाले.
कापसाला फायदा तर केळीचे नुकसान
शनिवारी रात्री झालेला मुसळधार पावसामुळे हंगामपूर्व लागवड करण्यात आलेल्या कापसाला फायदा झालेला आहे. तर वादळी पावसामुळे केळीच्या कांदेबाग आला मात्र फटका बसल्याचे चित्र जळगाव तालुक्यातील आव्हाणे, कठोरा, भादली, गाढोदे भागात दिसून आले. तसेच वादळी पावसामुळे आव्हाने खेडी परिसरातील विजेचे तार कोसळल्यामुळे पहाटे चार वाजेपासून वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती केल्यानंतर दुपारी दोन वाजे नंतर या गावांमध्ये वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.