जळगाव : तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवार, १८ जानेवारी रोजी होणार असून, याची प्रशासनाच्यावतीने तयारी पूर्ण झाली आहे. मतमोजणीसाठी ५० हून अधिक पर्यवेक्षक, सहायकांची नियुक्ती करण्यात आली आहे. १० टेबलवर १७ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. सुरुवातीला मोठ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार असून, सर्वप्रथम शिरसोली ग्रामपंचायतीच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ रोजी मतदान झाल्यानंतर रात्री उशिरा मतदान यंत्र जळगावातील नूतन मराठा महाविद्यालयात दाखल झाले. तालुक्यात ४० ग्रामपंचायतींसाठी ७८.४६ टक्के मतदान झाले. यामध्ये ४५ हजार १८९ पुरुष तर ३९ हजार ८८६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
प्रथम मोठ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी
मतमोजणीची तयारी पूर्ण करीत गावनिहाय मतमोजणीचेही नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये मोठ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रथम करण्यात येणार असून, शिरसोली ग्रामपंचायतीपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. यामध्ये ममुराबाद, आव्हाणे, आसोद, म्हसावद व इतर मोठ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होऊन नंतर लहान ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
अर्ध्या तासात पहिला निकाल
१८ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून, दुपारी तीन वाजेपर्यंत सर्व ४० ग्रामपंचायतींचे निकाल स्पष्ट होण्याचा अंदाज आहे. यामध्ये पहिला निकाल मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्या तासात म्हणजेच सकाळी साडे दहा वाजता समोर येण्याची शक्यता आहे.
१७ फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी
तालुक्यात मतदानासाठी १७० मतदान केंद्र होते. मतमोजणीची तयारी करताना १० टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, १७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यासाठी १० पथक व दोन राखीव पथक नियुक्त करण्यात आले असून, एका पथकात एक मतमोजणी पर्यवेक्षक व दोन सहायक असे तीन जण राहणार आहेत. मतमोजणीसाठी एकूण ५० हून अधिक जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आज मॉक ड्रील व प्रशिक्षण
मतमोजणीपूर्वी रविवार, १७ जानेवारी रोजी मतमोजणीसाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये मशीन कसे सुरू करावे, सील कसे उघडावे, नोंदी कशा घ्याव्या, असे मतमोजणीविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणासोबतच प्रशिक्षणाविषयीचे मॉक ड्रीलदेखील होणार आहे.
उत्सुकता शिगेला
ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रत्येक गावात मोठा उत्साह वाढला. अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, जि.प., पं.स. पदाधिकाऱ्यांचे कुटुंबीय यांच्यासह अनेक नवख्यांनीही नशीब अजमावण्यासाठी निवडणूक लढविली. १५ रोजी मतदान झाल्यानंतर गावोगावी विजयाचे गणित जुळविली जात असून, सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहे. सोमवारी काय निकाल लागतो, याविषयी ग्रामीण भागात मोठी उत्सुकता आहे.
दृष्टिक्षेपात मतमोजणीची तयारी
४० ग्रामपंचायती
१० मतमोजणी टेबल
१७ मतमोजणीच्या फेऱ्या
१० पथक
२ राखीव पथक
३ जण प्रत्येक पथकात
५० हून अधिक कर्मचारी