कजगाव, ता.भडगाव : येथून जवळच असलेल्या पासर्डी येथे शेतशिवारात बीजप्रक्रिया व कम्पोस्ट डेपोबाबत प्रात्यक्षिकाद्वारे खरीप हंगामाची मोहीम कृषी विभागामार्फत राबविण्यात आली. मोहिमेअंतर्गत खरीप हंगामात जैविक व रासायनिक बीजप्रक्रिया करूनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. बीजप्रक्रियेसाठी पी.एस.बी., अझेटोबॅक्टर, रायझोबियम, ट्रायकोडर्मा, रासायनिक औषधांच्या वापराचे महत्त्व पटवून देण्यात आले. रायझोबियम व अझेटोबॅक्टर हे जैविक खते युरियासाठी पर्याय म्हणून काम करतात. ट्रायकोडर्मा या मित्र बुरशीचे विविध उपचारामुळे पिकाच्या मुळांवर कवक तंतूंचा पातळ थर तयार झाल्यामुळे मर, मूळकूज इ. रोग पिकांवर येत नाही. शेतकऱ्यांनी संरक्षित शेती करून पिकाची फेरपालट, आंतरपीक, मिश्रपीक पद्धती, मूलस्थानी जलसंधारण, साफळा पिकांचा वापर, रुंद सरी वरंबा ( बी.बी.एफ. ) यंत्राने पेरणी इत्यादीचे महत्त्व पटवून देऊन चर्चा करण्यात आली. शेवटी जमीन सुपिकता निर्देशांक वाचन , कृषीक ॲपचा वापर, भित्तीपत्रिकांचे वाचन करून शेतकऱ्यांचे आभार मानण्यात आले. कार्यशाळेस अध्यक्षस्थानी सरपंच बालू पाटील , प्रमुख पाहुणे , ग्रामसेवक उमेश चव्हाण शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. तांत्रिक मार्गदर्शन कृषी सहायक अनिल तायडे यांनी केले.
२९/३