जळगाव : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात कोरोना रुग्णसंख्येने २८ हजारांचा आकडा ओलांडला असून नियमित ११०० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. यात प्रथमच शुक्रवारी ११४२ रुग्ण आढळून आले असून १२२२ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट नोंदविण्यात आली आहे. दुसरीकडे जळगाव शहरात मात्र, ६ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात एका २२ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.
जिल्ह्यात तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून शुक्रवारीही हे गंभीर चित्र कायम होते. जळगाव शहरात २४९ नवे रुग्ण आढळून आले असून ४४२ रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या २५४४ वर पोहोचली आहे. चोपड्यात शुक्रवारी ११५ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
हॉटस्पॉट टेस्टिंग
शहरातील अधिक रुग्ण आढळून येत असलेल्या परिसरांमध्ये जाऊन महापालिकेकडून तपासणी मोहीम राबविली जात आहे. यात शुक्रवारी खोटेनगर, कोल्हे नगर, एसएमआयटी कॉलेजचा परिसर या भागात ही तपासणी करण्यात आली. यात खोटेनगरात ४० जणांच्या तपासणीत ६ जण बाधित आढळून आले आहेत. परिसरात होणाऱ्या तपासणीत लोकांनी येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तंत्रनिकेतन विद्यालयात नियमित तपासण्या सुरूच असल्याचे सांगण्यात आले आहे.