जळगाव : महात्मा गांधी यांनी देशासाठी कसा निधी उभारला. यावर जळगावातील गांधी रिसर्च फाउंडेशनमधील डाॅ.अश्विन झाला व निर्मला झाला यांनी संशोधन करीत पीएचडी मिळविली आहे.
अश्विन झाला हे २०१० मध्ये जळगावला आले. त्यावेळी जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्व.भवरलाल जैन यांनी झाला दाम्पत्याला या विषयावर पीएचडी करण्यास सांगितले. त्यानुसार झाला दाम्पत्याने अहमदाबादच्या गुजरात विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. हे संशोधन सप्टेंबर २०१९ मध्ये विद्यापीठात सादर करीत त्याची मुलाखत नोव्हेंबर २०२० मध्ये झाली.
अश्विन झाला हे भावनगरच्या एमएसडब्लू महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पत्नी संशोधनासाठी जळगावला आल्या होत्या. सध्या हे दाम्पत्य याठिकाणी रिसर्च असोसिएट्स आणि संपादक म्हणून काम करत आहे, तर निर्मल झाला याठिकाणी रिसर्च फेलो म्हणून कार्यरत आहे.
या संशोधनात महात्मा गांधी यांनी कशा पद्धतीने निधी संकलित केला. कोणत्या कामासाठी केला. त्यातून त्यांनी काय साध्य केले यावर संशोधन केले आहे. निधी संकलित करताना तो सामान्य माणसांमधून करत असता. बऱ्याचदा ते आपल्याला मिळालेल्या काही वस्तूंचा लिलाव करीत होते. मानपत्रासोबत आलेल्या लाकडी बॉक्स किंवा ज्या वस्तूंची त्यांना गरजच नाही अशा वस्तूंचा संग्रह करण्यापेक्षा त्याचा लिलाव करून ते निधी संकलित करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लंडनमध्ये शिक्षण झाल्यानंतर गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले. त्यावेळी १८९७ मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला. त्यांनी नताल इंडियन काँग्रेसची स्थापना केली आणि १४०० पाउंडाचा निधी उभारला आणि कोलकाता येथे भारताच्या व्हाइसरॉयकडे पाठवला होता. त्यांनी आयुष्यभरात जवळपास ३०० वेळा निधी संकलित केला. त्यातील १०० वेळा निधी संकलित केल्याची यादी तयार केली आहे. त्यांनी १ कोटी १५ हजार रुपयांचा निधी टिळक स्वराज्य फंडातून उभा केला केल्याचे सांगितले.
प्रबंधाचे पुस्तक रूपात होणार प्रकाशन
अश्विन झाला यांनी ‘गांधी यांनी एकत्र केलेल्या निधीची पद्धत आणि शैली माध्यम, हिशोब कसा ठेवला आणि कसा प्रयोग केला यावर पीएचडी केली आहे, तर त्यांच्या पत्नी निर्मला यांनी गांधीजी आणि महाराष्ट्र यावर पीएचडी केली आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठातून प्रबंध सादर केले. त्यांना डॉ. सुदर्शन अय्यंगर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या प्रबंधांचे पुस्तक स्वरूपात प्रकाशनदेखील होणार आहे. त्याचे मराठीसह चार भाषांमध्ये भाषांतर केले जाणार आहे.