लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सायटोमेगालो व्हायरसचा पहिला बळी गेला आहे. अमळनेरच्या नितीन नंदलाल परदेशी (वय ३३) या तरुणाला कोरोनानंतर सायटोमेगालो या व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर त्याचा सोमवारी (दि. २४) रात्री मृत्यू झाला. पोस्ट कोरोनात सायटोमेगालो व्हायरसची लागण होऊन दगावलेला बहुधा पहिलाच रुग्ण असावा.
अमळनेरच्या नितीन परदेशी याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्याने कोरोनाचे उपचार अमळनेरमध्येच घेतले. त्यानंतर तो घरी गेला. त्याला पुन्हा ताप आला. त्यानंतर ऑक्सिजनची पातळी खालावली. त्यानंतर त्याला जळगावच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तरीही प्रकृती खालावत असल्याने तसेच व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याने डॉ. नीलेश किनगे यांच्या ॲक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर २५ दिवस उपचार करण्यात आले. अखेर सोमवारी रात्री उशिराने त्याची प्राणज्योत मालावली. पोस्ट कोरोनाच्या अडचणींमध्ये सायटोमेगालो व्हायरसने दगावलेला हा बहुधा पहिलाच रुग्ण असावा.
गेल्या काही दिवसांपासून नितीन परदेशी याची ऑक्सिजन पातळी घसरत होती. त्यातच त्याच्या एका डोळ्याची दृष्टी गेली. त्यानंतर त्याला सायटोमेगालो व्हायरसशी संबंधित औषधे देण्यात येऊ लागली. मात्र प्रकृती बिघडतच गेल्याने त्याचा मृत्यू झाला.
सायटोमेगालो हा नवीन विषाणू नाही. मात्र कोरोनातून बरे झाल्यानंतर अनेकांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी होते, अशा काळात रुग्णांना या विषाणूची लागण होण्याची शक्यता असते.