विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहातील खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना, सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. मूळ बीड येथील रहिवासी असलेला विश्वंभर खडके हा विद्यार्थी ‘जी.एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग’ या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ईएनटीसी’च्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. तो महाविद्यालयाच्याच वसतिगृहात राहत होता. सोमवारी महाविद्यालयात ‘मिसमॅच डे’ हा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी तो मित्रांसह गेला होता. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास तो तेथून वसतिगृहात परतला.
संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास त्याचा 'रुममेट' शिवमसिंह जितेंद्रसिंह राजपूत खोलीवर परतला तेव्हा दरवाजा आतून लावलेला होता. शिवमसिंहने विश्र्वंभरला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर शिवमसिंहने दरवाजा जोरात लोटला असता कडी उघडली व त्याला विश्वंभरने गळफास घेतल्याचे दिसले. ते दृष्य पाहताच शिवमसिंह खाली गेला व इतर विद्यार्थ्यांसह त्याने ती माहिती रेक्टरला दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांना कळवण्यात आले. नंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
दोन ते तीन दिवसांपासून तणावात
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून विश्वंभर तणावात होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली. सोमवारी दुपारी कार्यक्रम सुरू असताना त्याला दोन ते तीन वेळा मोबाईलवर कॉल आले. त्यावेळी तो उठून बाहेर बोलायला जात होता.
४:४१ वाजता मित्राशी शेवटचे बोलणे
कार्यक्रमाच्या ठिकाणाहून विश्वंभर निघून गेल्यानंतर शिवमसिंहने त्याला कॉल केला. दुपारी ४:४१ वाजता त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले, असे शिवमसिंहने सांगितले. दुपारी ३:३० वाजता विश्वंभर हा कार्यक्रमाच्या ठिकाणाहून निघून गेला त्यावेळी त्याला खूप घाम आलेला होता, असेही त्याने सांगितले. शिवमसिंह खोलीवर गेल्यावर दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने मनात भीती निर्माण झाली होती व दरवाजा उघडताच भयावह दृष्य दिसल्याचे शिवमसिंहने सांगितले.
‘बॅकलॉग’विषयी घरी सांगितले नाही!
अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये विश्वंभर दोन विषयांमध्ये अनुत्तीर्ण झाला होता. त्यापैकी एका विषयाची परीक्षा २२ फेब्रुवारीला झाली होती, तर २९ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या विषयाची परीक्षा होती; मात्र त्यापूर्वीच विश्वंभरने टोकाचा निर्णय घेतला. 'बॅकलॉग'विषयी त्याने घरी सांगितलेले नव्हते. परीक्षा झाल्यानंतर विषय निघाले अथवा राहिले तरी त्याविषयी घरी सांगणार असल्याचे त्याने त्याचा मित्र शिवमसिंहला सांगितले होते.