लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : चौघुले प्लाॅट भागात झालेल्या गोळीबार प्रकरणात सारवान गटाच्या राम उर्फ सोनू भगवान सारवान, नीलेश नरेश हंसकर, लखन भगवान सारवान, सनी राजू मिलांदे सर्व रा. गुरुनानक नगर, व पंकज भानुदास चौधरी रा. चौघुले प्लॉट या पाच जणांना रात्रीतून अटक करण्यात आली आहे. सोमवारी सर्वांना न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
व्हाॅटस्अपवर चिथावणी देणारे स्टेटस ठेवल्याने चौघुले प्लॉट भागात रविवारी सारवान व शिंदे गटात वाद उफाळून आला होता, त्यात गोळीबार होऊन विक्रम राजू सारवान हा जखमी झाला होता. याप्रकरणी रात्री उशीरा दोन्ही गटाविरुद्ध शनी पेठ पोलीस ठाण्यात दंगल, खुनाचा प्रयत्न व आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक गोळी मिळून आलेले आहे.
दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल होईपर्यंत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी शनिपेठ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. दोघांच्या फिर्याद घेतल्यानंतर स्वतः पोलीस अधीक्षकांनी तपासून पाहिल्या. दरम्यान, या गुन्ह्यात शिंदे गटातील संशयित फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.