जळगाव : तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच रात्री तब्बल पाच ठिकाणी घरफोड्या झाल्या असून चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम असा एकुण पाच लाखाच्यावर ऐवज लांबविला आहे. आहुजा नगर, नांद्रा बु येथे प्रत्येकी एक तर कानळदा येथे तीन अशा पाच ठिकाणी या घरफोड्या झालेल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी तालुका पोलिसात शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल झाला आहे.आहुजा नगरातील उषा भिमसिंग गिरासे या नंदुरबार येथे बहिणीकडे गेल्या असता त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी ६८ हजार रुपये रोख व दागिने असा १लाख ३१ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. आहुजा नगरातील घरी उषाबाई या एकट्याच राहतात. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या उषाबाई पाटील यांना शनिवारी सकाळी ६ वाजता गिरासे यांच्या घराचा दरवाजा उघडा दिसला तर कुलुप तुटलेले होते व दरवाजात पाण्याची बाटली आढळून आली. त्यांनी हा प्रकार उषाबाई गिरासे यांना कळविला. त्यामुळे गिरासे यांनी सकाळीच तेथून निघून १० वाजता जळगाव गाठले. घरातील साहित्याची पाहणी केली असता मुलगा, मुलगी, सून व त्यांचे स्वत:चे दागिने कपाटातून गायब झालेले होते तसेच ६८ हजाराची रोकडही गायब झालेली होती.नांद्रा येथे किराणा दुकान फोडून घरात चोरीनांद्रा बु. येथे चंद्रकांत श्यामराव पाटील यांच्या किराणा दुकानातून ५ हजार ५०० रुपये रोख, साडे तीन हजाराचे घड्याळ व घरातील ७५हजाराची मंगलपोत चोरट्यांनी लांबविली आहे. पाटील यांचे घर व किराणा एकच आहे. उकाडा होत असल्याने संपूर्ण कुटुंब गच्चीवर झोपले होते. हीच संधी साधून चोरट्यांनी पहाटे २.३० ते ३ वाजता किराणा दुकानाचे कुलुप तोडून घरात प्रवेश केला. सकाळी उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. पाटील यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे.कानळदा येथून ६८ हजाराचा ऐवज लांबविलाकानळदा येथे किशोर भगवान सपकाळे, सचिन पुंडलिक सपकाळे व वासुदेव सुपडू भोई यांच्या घरातून चोरट्यांनी ६८ हजाराचा ऐवज लांबविला आहे. शुक्रवारी रात्री गावात वीज पुरवठा खंडीत असल्याने किशोर सपकाळे, वडील भगवान सपकाळे, आई मिराबाई, पत्नी शितल व भाऊ किरण असा संपूर्ण परिवार गच्चीवर झोपायला गेले असता मध्यरात्री चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून कपाटातील २० हजार रुपये रोख व १० हजाराचे सोन्याचे दागिने लांबविले. पहाटे पाच वाजता वडील खाली आले असता हा प्रकार उघड झाला. सचिन सपकाळे यांचे गावात शिवाजी पुतळ्यासमोर किराणा दुकान आहे. या दुकानाचे कुलुप तोडून १० हजाराची चिल्लर व सहा हजाराच्या नोटा असे १६ हजार रुपये रोख लांबविण्यात आले. वासुदेव भोई यांच्या आश्रम रस्त्यावरील घराचे कुलुप तोडून १२ हजाराचे दागिने लांबविले. शहरासह तालुक्यात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. घराचे दार उघडे ठेवलेले दिसल्यास चोरी झालीच अशी परिस्थिती असून या प्रकाराची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.तातडीने शोध पथक रवानाया घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व सहकाऱ्यांनी आहुजा नगर, कानळदा येथे घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, मिळालेल्या माहितीच्या आधारावर तातडीने एक पथक चोपडा तालुक्यात रवाना करण्यात आले आहे.
जळगावात एकाच रात्री पाच घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 12:43 PM