शालेय पोषण आहार गैरव्यवहार प्रकरण : प्रशासनाने दाखविले केवळ दोनच वर्षांचे दप्तर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विवेकानंद प्रतिष्ठान संचलित ब. गो. शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी बुधवारी चौकशी समिती पुन्हा शाळेत आली होती. यावेळी समितीने तब्बल ५ तास चौकशी केली. यात समितीने १० वर्षांचे पोषण आहाराच्या दप्तरची मागणी केली होती. त्यापैकी शाळा प्रशासनाकडून दोन वर्षांचे दप्तर दाखविण्यात आले. तसेच समितीने मुख्याध्यापकासह उपस्थित शिक्षकांचे जबाब नोंदविण्याचे सांगितला असता मुख्याध्यापकांनी असमर्थता दाखविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शिंदे यांनी शानभाग विद्यालयातील शालेय पोषण आहाराची तक्रार केल्यानंतर या प्रकरणासाठी शिक्षण संचालकांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली आहे. समितीचे सदस्य गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, लेखा अधिकारी श्यामकांत न्हाळदे, शापोआ अधीक्षक अजित तडवी यांच्या समितीने आज दुसऱ्यांचा शाळेत जाऊन चौकशी केली आहे. यावेळी तक्रारदार रवींद्र शिंदे उपस्थित होते.
समितीने यापूर्वी शाळेकडे पोषण आहाराच्या दहा वर्षांच्या दप्तरची मागणी केली होती. मात्र शाळा प्रशासनाकडून दोन वर्षांचे दप्तर समितीला सादर करण्यात आले. दरम्यान, समितीने मुख्याध्यापक यांच्यासह उपस्थित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्याचे सांगितल्यावर मुख्याध्यापकांनी त्यास असमर्थता दाखविली. तसेच शाळा प्रशासनाने प्रथमच समितीसमोर याप्रकरणी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले. परंतु समितीने या चौकशीला शासनाकडून स्थगिती आली नाही. न्यायालयाचीदेखील स्थगिती नसल्याचे स्पष्ट केले. उर्वरित कागदपत्रांसाठी समिती पुन्हा २२ जुलै रोजी शाळेत जाणार आहे.