लोकमत न्यूज नेटवर्क
पाचोरा : पाचोरा-भडगावात तालुक्यात वाढलेली कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात यावी, यासाठी दिनांक १५ ते २२ मेपर्यंत ७ दिवसांचा जनता कर्फ्यू पाळण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यात व्यापाऱ्यांनी आमदार किशोर पाटील यांना आधीपेक्षा रुग्ण संख्या नियंत्रणात येत असल्याने जनता कर्फ्यूचा कालावधी कमी करण्याची विनंती केल्याने सर्व व्यापारी बांधवांच्या विनंतीला मान देत अखेर जनता कर्फ्यू दि. १४ मेच्या रात्री बारा वाजेपासून ते दि १९ मेच्या रात्री बारा वाजेपर्यंत अर्थात पाच दिवसांचा लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान, आधीच्या सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेतील केवळ मेडिकल पूर्णवेळ तर दूध डेअऱ्या या सकाळी ७ ते १० व संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत उघड्या ठेवता येणार आहेत तर कृषी केंद्र मात्र सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इतर सर्व प्रकारची व्यापारी प्रतिष्ठाने, किराणा दुकाने, भाजीपाला संपूर्णपणे बंद ठेवण्याबाबत सहमती झाली आहे. तसेच विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांविरुद्धदेखील दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व जनतेने या जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत आपण जबाबदार नागरिक आहोत हे सिद्ध करावे, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.