जळगाव- सोमवारी दुपारी घराबाहेर निघालेल्या ईश्वर आबा महाडीक (वय-२२, रा़ पथराड, ता़ धरणगाव) या तरूणाचा पाच दिवसानंतर गावातीलच एका शेतामध्ये मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी ४ वाजता उघडकीस आली आहे़ याबाबात पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.ईश्वर महाडीक हा तरूण धरणगाव तालुक्यातील पथराड येथे आई-वडील व बहिणींसोबत वास्तव्यास होता. त्याचे आयटीआयचे शिक्षण पूर्ण झालेले असून एका गॅरेजवर कामाला होता़ वडील हातमजुरी करून घराचा उदरनिर्वाह करायचे़ दरम्यान, सोमवार, ९ सप्टेंबर रोजी ईश्वर हा दुपारी घराबाहेर निघाला़ त्यानंतर घरी परतलाच नाही़ त्यामुळे कुटूंबीय त्याचा शोध घेत होते. परंतू, शनिवारी पथराड गावातीलच एका शेतात ईश्वर याचा मृतदेह हा फुगलेल्या व चिन्नविछीन्न अवस्थेत शेतमालकास आढळून आला. याबाबत गावात माहिती दिल्यानंतर मृतदेह हा ईश्वर याचा असल्याचे समोर आले. नंतर हा मृतदेह नातेवाईकांसह कल्पेश मराठे, प्रशांत सूर्यवंशी, भटू पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, शरद शिंदे यांच्या मदतीने जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला़ याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पाच दिवसानंतर तरूण सापडला ‘मृतावस्थेत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 7:37 PM