लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील एक शिक्षक दाम्पत्यासह एकाच कुटुंबातील पाच जण कोरोना बाधित आढळून आले आहे. शहरात १८ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात विमानाने जळगावात आलेले एक आई व तीन वर्षाचा मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे आरटीपीसीआर चाचणीत समोर आले आहे.
जिल्ह्यात गुरूवारी ३७ नवे रुग्ण आढळून आले. ५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आरटीपीसीआरचे ६९४ अहवाल आले तर ॲन्टीजनच्या २३१ चाचण्या करण्यात आल्या. यात अनुक्रमे २३ आणि १४ जण बाधित आढळून आले आहेत. प्रलंबित अहवाल निकाली निघाले असून आता ५० अहवाल प्रलंबित आहे.
या भागात रुग्ण
जळगाव शहरात पुन्हा एकदा रुग्णवाढ समोर येत आहे. त्यात बाहेरून विमानाने आलेल्या आई व मुलाची विमानतळावरच आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. त्यात ते दोघेही बाधित आढळून आले आहेत. मात्र, ते नेमके कुठून आले याची माहिती समोर आलेली नाही. हे दोघेही भिकमचंद जैन नगरातील रहिवासी आहेत. यासह कासमवाडी १, शिवाजीनगर १, नवी पेठ १, शिवकॉलनी १ आणि अन्य दोन असे बाधित रुग्ण समोर आले आहेत.
एक लाख चाचण्या पूर्ण
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गुरुवारी ४ फेब्रुवारी रोजी सूक्ष्मजीवशास्त्र प्रयोगशाळेत कोरोनाच्या नमुना तपासण्यांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. साडे आठ महिन्यातच हा टप्पा ओलांडला आहे. विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले आणि डॉ. डांगे हे या प्रयोगशाळेची जबाबदारी सांभाळत आहेत.