लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : लग्न करुन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या पाचपैकी एक दलाल जामनेर येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. अटक करण्यात आलेल्या पाचही आरोपीना तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
सोनू राजू शिंदे , पूजा प्रताप साळवे (दोन्ही रा. सिद्धार्थ नगर, हिंगोली) , प्रीती राजेश कांबळे (रा. हिंगोली) सोनू हिचा भाऊ भैरव शिंदे, मामा योगेश संजय साठे (रा. शिवसेना नगर, अकोला) यांचा अटक करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.
खान्देशातील बेरोजगारी, मुलींची संख्या कमी असल्याने तरुणांना मुली न मिळणे ही आता सामाजिक समस्या झाली आहे. त्यातून लग्नासाठी मुली विकण्याचा नवा धंदा उदयास आला आहे. यातून हे फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. मंदाणे ता. शहादा येथील भूषण सैंदाणे याच्याशी सोनू शिंदे हिचे लग्न झाले. यासाठी भूषणकडून १ लाख ३० हजार रुपये घेण्यात आले. यानंतर अवघ्या काही दिवसात ती पळून गेली. यानंतर सूरत येथील सुनील माणिक पाटील तरुणाशी लग्न करुन तीने दोन लाखात फसविले.
इकडे भूषणने बायको हरवल्याची फिर्याद दिली. यानंतर सोनू ही कपिलेश्वर मंदिर ता. अमळनेर येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस तिथे पोहचले असता ते पढावद येथे गेल्याचे समजले. पोलीस पढावद येथे पोहचले. तिथे पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणात तिची आई वंदनाबाई , बाबाराव आमले (रा. औरंगाबाद) , भाऊ भैरव, पूजा साळवे, योगेश साठे, प्रीती राजेश कांबळे यांच्यासह दलाल रवींद्र गयभू गोपाळ (कुंभारी ता. जामनेर) याचाही समावेश असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी वरील पाच जणांना अटक केली. उर्वरित आरोपी पढावद येथे पोलिसांना पाहूनच पसार झाले. अटक केलेल्या आरोपीना शहादा न्यायालयात हजर केले असता न्या. डिंपल सैंदाणे यांनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.