लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे ९८२ रुग्ण समोर आले आहेत. तर ३० व ४२ वर्षीय तरूणांसह पाच बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. गेल्या पाच दिवसात मृत्यूचे प्रमाण वाढले असून यात ५० वर्षाखालील रुग्णांचेही मृत्यू होत असल्याचे गंभीर चित्र आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी जळगाव शहरात सर्वाधिक ३६३ रुग्ण आढळून आले आहेत. यासह भुसावळातही संसर्ग वाढला असून १९८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. चोपडा, चाळीसगावात कोरोना वाढतच असून या ठिकाणीही अनुक्रमे ७४ आणि१३२ रुग्ण समोर आले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात जाहीर करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठा व दुकाने बंद होती. रस्तेही निर्मनुष्य होती. सायंकाळी काही प्रमाणात लोक बाहेर पडली, मात्र, पोलिसांनी त्यांना परत पाठविले.
गृहविलगीकरणाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल
गृहविलगीकरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढे कोरोनाबाधितांवर प्रशासनाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी दिले आहे. यंत्रणांनी यावर लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केल्या आहेत.