ऑनलाइन लोकमत
धुळे : कुकुरीने सपासप वार करून एकाचा खून केल्याप्रकरणी पाच जणांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा झाली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़एच़ काळे यांनी सोमवारी सुनावली़ ही घटना तालुक्यातील मुकटी येथे २१ जानेवारी २०१४ रोजी घडली होती़
जन्मठेप झालेल्यांमध्ये सतीश उर्फ योगेश निंबा पाटील, सुनील निंबा पाटील, ईश्वर खंडू पाटील, चंदू ईश्वर पाटील, उमेश ईश्वर पाटील यांचा समावेश आहे तर योगेश नाना पाटील हा फरार आहे.
मुकटी येथे मागील भांडणाच्या कारणावरून २९ जानेवारी २०१४ रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सतीश उर्फ योगेश निंबा पाटील, सुनील निंबा पाटील, ईश्वर खंडू पाटील, चंदू ईश्वर पाटील, उमेश ईश्वर पाटील आणि योगेश नाना पाटील (फरार) यांनी समाधान पंडित पाटील आणि दत्तात्रय पाटील यांच्याशी वाद घातला आणि कुकरीसारख्या हत्याराने वार केले. त्यात समाधान पाटील याचा मृत्यू झाला. तर दत्तात्रयच्या पोटातील आतडे बाहेर निघाले होते.
याबाबत तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३०७, ३४१, ११४, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ तसेच आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.