जळगाव : शहरातील तांबापुरा व गवळीवाडा या भागात रविवारी रात्री दहा वाजता अचानक तुफान दगडफेक झाली. त्यात पाच जण जखमी झाले असून तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे ठोस कारण समजू शकले नाही. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर तांबापुरात संचारबंदीसदृष्यस्थिती आहे.सर्वत्र पळापळ; मुले व वृद्धांचे प्रचंड हालघटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, तांबापुरामधील गवळीवाड्यातील हटकर चौक व श्रीकृष्ण मंदिर परिसरात रात्री दहा वाजता एका दिशेने २० ते २५ जणांचा जमाव चालून आला व त्यांनी घरांवर व गल्लीत विटा, दगडांचा तुफान मारा सुरु केला तर काही जणांनी दारु व बियरच्या बाटल्या फोडल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने सर्वत्र पळापळ झाली. लहान मुले, महिला व वृध्दांची प्रचंड धावपळ उडाली. पळताना ते जमिनीवर कोसळले. काय झाले हे कोणालाच कळत नव्हते, मात्र जो तो जीव वाचविण्यासाठी पळत होता. तर घरांचे दरवाचे बंद केले जात होते.पोलिसांवरही विटांचा मारादगडफेक व तणावाची स्थिती निर्माण झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा तांबापुरा, गवळीवाडा भागात दाखल झाला. हटकर चौकात ५० ते ६० जणांच्या टोळक्याकडून तुफान दगडफेक होत होती. हेल्मेट व संरक्षण जाळी घेऊन गेलेल्या पोलिसांच्या अंगावरही या टोळक्याने दगडफेक केली. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील गायकवाड, एमआयडीसीचे उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्या अंगावरही विटांचा मारा झाला, मात्र हेल्मेटमुळे हे दोन्ही अधिकारी बचावले. काही जण घरांमधून दगडफेक करीत होते. अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, उपअधीक्षक सचिन सांगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, एमआयडीसीचे निरीक्षक अनिरुध्द अढाव रात्री उशिरापर्यंत तांबापुरात ठाण मांडून होते.
जळगावातील तांबापुरात रात्री तुफान दगडफेक, पाच जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 11:52 PM
तिघांवर ‘सिव्हील’मध्ये उपचार
ठळक मुद्देगल्यांमध्ये दगड, दारुच्या बाटल्यांचा खचसंचारबंदी सदृष्यस्थिती