लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या विशेष निर्बंध काळात कोणीही गरीब व गरजू व्यक्ती उपाशी राहू नये, याकरीता शिवभोजन थाळी मोफत दिली जात असून जिल्ह्यातील ३८ केंद्रांवरून दररोज पाच हजार १२५ जणांचे उदरभरण केले जात आहे. निर्बंध काळात जिल्ह्यात एक लाख ८४ हजार ५०० लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा मोफत लाभ घेतला, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली. दरम्यान, मोफत शिवभोजन थाळी १५ जूनपर्यंत देण्यास मुदतवाढ मिळाल्याने गरजूंना याचा लाभ होणार आहे.
जिल्ह्यात २६ जानेवारी २०२० रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. सुरूवातीस जिल्ह्यासाठी ७०० थाळ्यांचे उद्दिष्ट शासनाकडून देण्यात आले होते. त्यानंतर फेब्रुवारी, २०२० मध्ये हा इष्टांक दुप्पट म्हणजेच १४०० थाळी करण्यात आला. त्यानंतर तालुका स्तरावर शिवभोजन योजनेचा विस्तार करण्यात येऊन जिल्ह्याचा इष्टांक ३ हजार ५०० थाळींपर्यंत वाढविण्यात आला.
जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण ३८ शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत. त्यापैकी शहरी भागात १६ व ग्रामीण भागात २२ केंद्र आहेत. शहरी भागात १६ केंद्रामधून १ हजार २५० थाळ्या तसेच ग्रामीण भागात २२ केंद्रामधून २ हजार १७५ थाळ्या वितरीत करण्यात येतात. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत १५ एप्रिल २०२१ पासून विशेष निर्बंध लागू असल्याने शासनाने एक महिना कालावधीसाठी शिवभोजन केंद्रांचा इष्टांक दीडपटीने वाढवून दिला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत असलेल्या ३८ शिवभोजन केंद्रांना इष्टांक दीडपटीने वाढवून दिल्याने याचा लाभ जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना दररोज होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात दररोज ५ हजार १२५ थाळ्यांचे वितरण सुरू आहे. आता या दीडपट वाढीला १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिवभोजन केंद्रात मिळणारी थाळी यापूर्वी दहा रूपयांना मिळत होती. जास्तीत जास्त गरीब व गरजूंना लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा यासाठी मागील लॅाकडाऊन कालावधीपासून एका थाळीसाठी पाच रुपये किंमत ठेवली होती. आता विशेष निर्बंध कालावधीमुळे १५ जून पर्यंत ही थाळी पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे.