जळगाव : एसटी महामंडळातर्फे प्रवासी सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी `स्मार्ट कार्ड`सक्तीचे केले असून, नोंदणी केल्यानंतर दीड ते दोन महिन्यात नागरिकांना कार्ड वितरित करण्यात येत आहेत. मात्र, नोंदणी केल्यानंतर हे कार्ड बनविणाऱ्या बंगळुरुच्या खासगी कंपनीने या `स्मार्ट कार्ड`मध्ये अनेकांचे फोटो व नावे चुकविल्याचे आढळून आल्याने, हे कार्ड दुरुस्तीसाठी पुन्हा महामंडळातर्फे संबंधित कंपनीकडे परत पाठविण्यात आले आहेत. तर आतापर्यंत आगार प्रशासनातर्फे ४५ हजार नागरिकांना `स्मार्ट कार्ड ` वितरित करण्यात आले आहेत.
पूर्वी अनेक नागरिक वयाची ६० वर्षे पूर्ण झालेली नसतानाही, बनावट ओळखपत्र तयार करून एसटी महामंडळाच्या प्रवासी सवलतीचा लाभ घेत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले होते. हा गैरप्रकार रोखण्यासाठी महामंडळाने जून २०१९ पासून `स्मार्ट कार्ड योजना` आणली आहे. या योजनेनुसार महामंडळातर्फे प्रवाशांना आधार क्रमांकाशी जोडलेले अत्याधुनिक `स्मार्ट कार्ड` देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे हे कार्ड सवलतीचा लाभ घेणाऱ्या नागरिकांच्या आधारकार्डवरील क्रमांकाशी जोडले गेले असल्यामुळे, गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसणार आहे. दरम्यान, जूनपासून २०१९ पासून ही योजना सुरू झाल्यानंतर, जळगाव आगारातर्फे `स्मार्ट कार्ड`च्या नोंदणीसाठी जळगाव आगारात स्वतंत्र कक्ष उघडण्यात आला आहे. सुरुवातीला हजारो सवलत धारकांनी नोंदणी केल्यानंतर, त्यांना काही दिवसातच `स्मार्टकार्ड` वाटप करण्यात आले आहेत; मात्र मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, कोरोना काळात ही नोंदणी बंद होती. त्यानंतर महामंडळाची बससेवा पुन्हा सुरू झाल्यानंतर, तेव्हापासून आगारात `स्मार्ट कार्ड`ची नोंदणी सध्याही सुरूच आहे.
इन्फो :
पाच हजार `स्मार्ट कार्ड `आढळले चुकीचे
जळगाव आगार प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी स्मार्ट कार्डची नोंदणी केल्यानंतर त्यांचा नोंदणीचा संपू्र्ण डाटा स्मार्ट कार्ड बसविणाऱ्या कंपनीकडे जातो. महामंडळाने बंगळुरु येथील एका खासगी कंपनीला डिजिटल पद्धतीचे हे स्मार्ट कार्ड बनविण्याचा मक्ता दिला आहे; मात्र या कंपनीने आतापर्यंत पाठविलेल्या पाच हजार `स्मार्ट कार्ड` मध्ये फोटो नसल्याचे तर काहींची नावे चुकलेली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही स्मार्ट कार्ड संबंधित कंपनीला आगार प्रशासनातर्फे परत पाठविण्यात आली आहेत.
इन्फो :
आतापर्यंत ४५ हजार स्मार्ट कार्डचे वाटप
योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत जळगाव आगार प्रशासनातर्फे ४५ हजारांहून अधिक सवलत धारकांचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे १७ हजार ११, ज्येष्ठ नागरिक २८ हजार, दलित मित्र पुरस्कार प्राप्त ८, अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त नागरिकांना ५, दिव्यांग बांधव २०, तसेच इतर सवलत धारकांना आतापर्यंत हे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहेत.