जळगाव : खान्देशात उष्णतेच्या लाटेचा कहर सुरूच असून बुधवारी जळगाव येथे यंदाच्या मोसमातील सर्वोच्च 47 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळ्यातही पा:याने 45 अंशाचा टप्पा ओलांडला असून तापमान 45.6 अंशावर पोहचले आहे. नंदुरबार येथे गेल्या तीन दिवसांपासून पारा 44 अंशांवर कायम आहे. नंदुरबारनजीकच्या कोळदा कृषी विज्ञान केंद्रावर बुधवारी 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. खान्देशात 21 मेर्पयत उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
उष्णतेच्या तीव्र लाटेत विदर्भ, मराठवाडा आणि खान्देश होरपळून निघाला आहे. उष्माघाताने नऊ जणांचा बळी गेला असून त्यामध्ये विदर्भातील चार आणि खान्देशातील पाच जणांचा समावेश आहे. राज्यात बुधवारी सर्वाधिक 47.1 अंश सेल्सिअस तापमान अकोला येथे नोंदवण्यात आले. तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण येथे सात माकडांचा मृत्यू झाला. हवामान खात्याने महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली या भागात अतिउष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून, ही लाट 21 मेर्पयत राहील, असा अंदाज आहे. तेलंगणात आतार्पयत मरण पावलेल्यांची संख्या 309 वर गेली आहे. दक्षिण आणि ईशान्य भारतात मात्र पावसाचा कहर सुरू आहे.