जळगाव : महाराष्ट्रातील सर्वोच्च उंचीचे असलेले कळसूबाईचे शिखर साडेपाच वर्षाचा आरुष व आठ वर्षाची यशश्री यांनी अवघ्या तीन तास १० मिनिटात सर केले. जिल्हा पोलीस दलात उपअधीक्षक असलेले ईश्वर कातकाडे यांची ही मुले आहेत. मुलांनी शिखराला गवसणी घातल्याने कातकाडे यांनी दोघांना सॅल्यूट ठोकला. याबाबत कातकाडे यांनी आपला अनुभव ‘लोकमत’ जवळ कथन केला.
कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १६४६ मीटर आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची उंची अंदाजे ९०० मीटर आहे. यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्यांच्या सभोवताली शेती केलेली आहे. तरुणाला किंवा प्रौढाला अर्ध्या दिवसातही कळसूबाईचे शिखर सर करणे शक्य होत नाही. शिवजयंतीचे औचित्य साधून कातकाडे त्यांच्या पत्नी वैशाली, मुलगी यशश्री, मुलगा आरुष, मित्र तथा अहमदनगरचे भूसंपादन अधिकारी अजित थोरबोले,त्यांच्या पत्नी सुप्रिया, मित्र सुनील गायकवाड हे सर्वजण ट्रेकिंगसाठी गेले होते. २० फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता मुक्कामाच्या ठिकाणाहून कळसुबाई शिखराकडे ट्रेकिंगसाठी प्रयाण केले. शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या बारी गावात साडेचार वाजता पोहचले. बॅटरीच्या उजेडात चालायला सुरुवात केली. एक तास होताच धापा टाकायला सुरुवात झाली आणि सुरू झाली मनाची अणि शरीराची कसोटी, परंतु सर्वांच्या मनात उत्साह संचारला होता. शिखर पूर्ण करण्यासाठी ३ तास आणि १० मिनिटे लागली. सर्वजण थकलो होतो. परंतु सर्वांच्या चेहऱ्यावर कळसुबाई शिखर सर केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.