आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१७ : रस्त्याचे कॉँक्रीटीकरण करताना नालीवर फरशी ठेऊ देणार नसल्याच्या कारणावरुन दोन जणांच्या डोक्यात दगड व कुºहाडीने वार करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात सुपडू दगा पाटील (वय ५६), पत्नी सुनंदाबाई सुपडू पाटील (वय ४५) व मुलगा दीपक सुपडू पाटील (वय २४) सर्व रा.उत्राण अ.ह.ता.एरंडोल या तिघांना न्यायालयाने मंगळवारी पाच वर्षाची शिक्षा सुनावली.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २५ जून २०१४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता पाटीलवाड्यात रत्नाबाई राजेंद्र पाटील व त्यांचे शेजारी सुनंदाबाई सुपडू पाटील यांच्यात नाल्यावर फरशी ठेवण्याच्या कारणावरुन वाद झाला होता. त्यावेळी दीपक पाटील याने रत्नाबाई यांचा मुलगा समाधान याच्या डोक्यात दगड मारुन दुखापत केली होती तर सुनंदाबाई हिने रत्नाबाई हिचे वडील दयाराम देवराम पाटील यांच्या डोक्यात कु-हाड मारुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी कासोदा पोलीस स्टेशनला कलम ३०७, ३२३, ५०४,५०६, ४२७ व ३४ याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
अकरा साक्षीदार तपासले
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात हा खटला चालला. त्यात सरकारपक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी रत्नाबाई पाटील, जखमी दयाराम पाटील, समाधान पाटील, वैद्यकिय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व तपासाधिकारी नजीम रहेमान शेख यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन कलम ३०७ व ३४ प्रमाणे ५ वर्ष सश्रम कारावास व ५०० रुपये दंड, ३२३, ५०४, ५०६ या प्रमाणे १ वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी १०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दोन्ही शिक्षा एकत्र भोगावयाच्या आहेत. सरकारतर्फे अॅड.चारुलता राजेंद्र बोरसे यांनी काम पाहिले.
अन् न्यायालयत रुडू कोसळले तिघांना
नियमित तारखेप्रमाणे तिन्ही आरोपी मंगळवारी न्यायालयात आले होते. न्यायालय आज शिक्षा सुनावणार याची पुसटशीही कल्पना नसल्याने निकाल ऐकताच वडील, आई व मुलाला रडू कोसळले. या निकालामुळे सुनंदाबाई प्रचंड घाबरल्याने त्यांना पती व मुलगा धीर देत होता. लगेच कारागृहात रवानगी झाल्याने कुटुंबातील अन्य सदस्य व नातेवाईकांना न्यायालयातूनच कळविण्यात आले.