ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 28 - बेलगंगा सहकारी साखर कारखान्याची जिल्हा बँकेकडून हस्तांतर प्रक्रिया गेल्या आठवड्यात पुर्ण झाली. बेलगंगेचा ताबा अंबाजी गृपकडे आला आहे. प्रजासत्ताकदिनी मुख्य प्रवर्तक व माजी चेअरमन चित्रसेन पाटील यांच्या हस्ते दहा वर्षानंतर कारखाना परिसरात ध्वजारोहण झाले. २००७-०८ गळीत हंगाम सुरु असतांनाच जिल्हा बँकेने भाडे करार रद्द केल्याने कारखान्याला कुलूप लागले. चित्रसेन पाटील यांनी लोकसहभागातून ३९ कोटी २० लाख रुपयांना बेलगंगा विकत घेतला. गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेने भूमीपुत्रांकडे कारखान्याचा ताबा दिला. कामगारांशी सकारात्मक चर्चाअगोदरच जाहीर केल्यानुसार ध्वजारोहणानंतर कामगारांची बैठकही घेण्यात आली. यावेळी तीनशेहून अधिक कामगार उपस्थित होते. कामगारांचे थकीत वेतन (काम केलेले) याबरोबरच कामगारांच्या वारसांना गुणवत्तेनुसार काम देण्याबाबत दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली. यावेळी प्रविण पटेल, दिलीप रामराव चौधरी, विजय अग्रवाल, दिनेश पटेल, प्रेमचंद खिंवसरा, डॉ. अभिजीत पाटील, रविंद्र केदारसिंग पाटील, अजय शुक्ल, निशांत मोमया, डॉ. मुकूंद करंबेळकर, निलेश निकम, प्रशांत मोराणकर, भुषण ब्राम्हणकार, किरण देशमुख, राजेंद्र धामणे आदी उपस्थित होते.