ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10- तोंडाला लाल रुमाल बांधून आलेल्या एका व्यक्तीने दक्षता नगर पोलीस लाईनमधील उजेर शेख जाकीर (वय 13) या मुलाचे अपहरण केल्यानंतर पकडले जाण्याच्या भीतीने त्याला पाचोरा स्थानकावर सोडून रेल्वेने हा अपहरणकर्ता पुढे गेला. जळगाव येथून जाताना त्याने दुचाकी रेल्वे स्टेशनवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ लावल्याचे उजेर याने सांगितले. दरम्यान, पाचोरा स्थानकावरील राहूल पवार या प्रवाशाच्या समयसूचकतेने हा मुलगा सुखरुप राहिला.अपहरण झालेला उजेर हा शनिवारी पहाटे तीन वाजता जळगावात घरी आला. लोकमत प्रतिनिधीने त्याची भेट घेतली असता उजेर याने आपबिती कथन केली, ती त्याच्याच शब्दात.उजेर हा शुक्रवारी रात्री नमाज पठण करुन आल्यानंतर शाहू नगरात मदरशात गेला होता. तेथून परत येत असताना रात्री नऊ ते साडे नऊ या दरम्यान तोंडाला लाल रुमाल बांधलेला एक दुचाकीस्वार जवळ आला. कुठे जायचे आहे असे त्याने विचारले. घरी जात असल्याचे सांगितल्यानंतर ‘मी तुला घरी सोडतो’ असे सांगून दुचाकीवर बसवून थेट रेल्वे स्टेशन गाठले. तेथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ दुचाकी लावली व नंतर रेल्वेत बसवून नेले. इतका सारा प्रकार घडत असताना नेमके काय होते आहे हे उजेर याला कळलेच नाही.बराच वेळ झाल्यानंतरही उजेर घरी न आल्याने जळगावात त्याची सर्वत्र शोधाशोध सुरु होती. त्याच्या आईने जळगावातील नातेवाईकांना तो पाचोरा रेल्वे स्थानकावर असल्याची माहिती दिली. त्यानंतर सर्व नातेवाईकांचा जावीत जीव आला. ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्या आत्याचे पती हेडकॉन्स्टेबल सलीम खान बशारत खान, अफजल खान, रईस शेख असे तातडीने कारने पाचोरा रवाना झाले. तेथे लोहमार्ग पोलीस ईश्वर बोरडे व सहका:यांनी उजेर याला साडे बारा वाजता नातेवाईकांच्या ताब्यात दिले. प्रवाशी पवार हे देखील थांबून होते. उजेर याला घेऊन नातेवाईक पहाटे तीन वाजता जळगावात पोहचले.उजेर हा यावल येथील रहिवाशी आहे. वडील जाकीर शेख शेती व्यवसाय करतात. त्यांना दोन मुली व एक मुलगा आहे. मुलाचे चांगले शिक्षण व्हावे यासाठी त्याला जळगाव येथे आत्याकडे यंदापासून पाठविण्यात आले आहे. त्याच्या आत्याचे पती सलीम खान बशारत खान हे पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल आहेत. बॅँडमास्तर म्हणून ते कार्यरत आहेत. पाचोरा रेल्वेस्टेशनवर रडताना आढळला अपहरणकर्ता व उजेर हे दोन्ही जण रात्री 10.30 वाजता पाचोरा रेल्वे स्थानकावर उतरले. त्यावेळी आपण कुठे आहोत याबाबत उजेर याला थोडी जाणीव झाली. उजेर याची चंचलता लक्षात आल्यानंतर अपहरणकर्ता त्याला पाचोरा रेल्वे स्टेशनवर सोडून त्याच गाडीत बसून पुढे रवाना झाला. थोडय़ावेळाने सर्व प्रवाशी निघून गेल्यानंतर स्टेशनवर गर्दी कमी झाली होती. उजेर हा प्लॅटफार्म क्र मांक तीनवर रडत असताना राहूल पवार या प्रवाशाच्या लक्षात आले. त्यांनी आस्थेवाईकपणे उजेरची चौकशी केली असता तो जळगावचा असल्याचे समजले. एकटा व इतक्या रात्री इकडे कसा म्हणून पवार यांना प्रश्न पडला. त्यांनी घरातील कोणाचा मोबाईल अथवा फोन क्रमांक विचारला. तेथून लोहमार्ग पोलीस चौकीत नेले. तेथील पोलिसांनाही पवार यांनी घटनेची माहिती दिली.