भडगाव, जि. जळगाव : तितूर नदीला २५ रोजी पंचवीस दिवसांत चौथा महापूर आल्याने तितूर नदीकाठावरील शेतकऱ्यांना धडकीच भरली आहे. या पुरामुळे कजगाव- नागद तसेच घुसर्डी- पासर्डी या दोन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
कजगाव -नागद मार्गावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने वाहून गेलेल्या भरावाच्या जागी कच्चा भराव करण्यात आला; मात्र आलेल्या महापुरात हा भराव वाहून गेला. दोन वेळेस हा भराव वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे.
घुसर्डी, पासर्डी या दोन गावांच्या मधून तितूर नदी गेली आहे. या गावातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी नदीवर लहान पूल (फरशी) बनविण्यात आला आहे; मात्र महापुरात पूल तुटल्याने माती वाळूचा भराव करत हा मार्ग सुरू करण्यात आला होता. पुन्हा पुन्हा येणाऱ्या पुराच्या प्रवाहात कच्चा भराव वाहत असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.
दि. २५च्या रात्री आलेल्या पुरामुळे पुन्हा या दोन मार्गांवरील वाहतूक बंद पडली आहे. प्रत्येक मार्गावर कच्चा भराव करत हे सारे रस्ते सुरू होतात आणि पूर आला की ते वाहते होतात, असा हा खेळ गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू आहे.