जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात शुक्रवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरु आहे. हतनूर धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणाचे सर्व म्हणजे ४१ दरवाजे उघडण्यात आले आहेत. रावेर तालुक्यातील निंबोल आणि ऐनपूर या गावात पुराचे पाणी शिरले आहे.
ऐनपूर ता. रावेर परिसरात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ऐनपूर आणि निंबोल गावात पुराचे पाणी शिरले आहे. ऐनपूर येथील जिल्हा परिषदेची उर्दू शाळा अर्धीअधिक पाण्यात बुडाली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. तापी नदीला महापूर आला आहे. यामुळे अंतुर्ली ते पातोंडी या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे. पातोंडी गावाचा संपर्क तुटला आहे.