लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरात वाघूर धरणाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू असून, रविवारी सकाळी झालेल्या पावसाने लौकी नाल्याच्या पुराचे पाणी त्यात शिरले. त्यामुळे काळेकुट्ट पाणी थेट जळगाव- ममुराबाद रस्त्यापर्यंत येऊन पोहोचले. जलवाहिनीसाठी नुकताच खोदलेला रस्ताही मोठ्या प्रमाणात खचल्याने वाहतूक काहीकाळ विस्कळीत होण्याचा प्रकार घडला.
वाघूर धरणाचे पाणी सिंचनासाठी शेतीशिवारात खेळविण्याच्या उद्देशाने गेल्या काही महिन्यांपासून लहान व मोठ्या जलवाहिन्या टाकण्याचे काम परिसरात रात्रंदिवस सुरू आहे. त्याचाच एक भाग असलेली एक मोठी जलवाहिनी नुकतीच जळगाव - ममुराबाद रस्त्याला ओलांडून नेण्यात आली. त्यासाठी संपूर्ण रस्ता संबंधित यंत्रणेकडून खोदण्यात आला होता. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर खोदलेल्या रस्त्याच्या भागात चांगला मजबूत भराव टाकण्याची गरज असताना, तशी कोणतीच काळजी घेण्यात आली नाही. थातूरमातूर पद्धतीने बुजलेला त्याठिकाणचा रस्ता त्यामुळे पहिल्याच पावसाने खचला. त्यात वाघूरच्या जलवाहिनीद्वारे वाहून आलेल्या लौकी नाल्याच्या पाण्यामुळे खोदलेल्या रस्त्याची आणखी जास्त वाईट अवस्था झाली. सुदैवाने घडलेला प्रकार वेळीच लक्षात आल्याने अवजड वाहने दोन्ही बाजूला थांबविण्यात आली. ठेकेदाराची माणसे आल्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने खड्ड्यात माती टाकण्यात आली तसेच लौकी नाल्याचे पाणी वळविण्यात आले. तेव्हा कोठे खोळंबलेली वाहतूक सुरळीत आली. दरम्यान, वाघूरच्या जलवाहिनीमधून वाहून आलेले लौकी नाल्याचे पाणी ममुराबाद रस्त्यालगतच्या बऱ्याच शेतांमध्ये शिरल्याचे दिसून आले. काही ठिकाणी थेट रस्त्यावरून वाहणाऱ्या काळ्या पाण्यातून वाट काढताना वाहनधारकांना कसरत करावी लागली.
---------------------